बाकुबा : इराकमधील कुर्द नियंत्रणाखाली असलेल्या बाकुबा शहरात एकापाठोपाठ तीन कारबॉम्बचा स्फोट झाला असून, त्यात किमान २५ लोक मरण पावले आहेत. मृतांत बहुतांश कुर्द नागरिक आहेत. मेयर वहाब अहमद या स्फोटात किरकोळ जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० कारा तापाह हा भाग तीन कारबॉम्बस्फोटानी हादरला. कारा तापाह जलवला गावाजवळ आहे. जलवला येथे सरकारी फौजा व इसिस फौजा यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. मेयर वहाब अहमद यांचे कार्यालय हेच स्फोटाचे मुख्य लक्ष्य होते. कार्यालयाची पडझड झाली असून, आजूबाजूच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे. एका वरिष्ठ कुर्द अधिकाऱ्याने मृतांचा आकडा २७ असल्याचे म्हटले असून, मृतांत बहुतांशी इसिसविरोधात लढणारे कुर्द अधिकारी असल्याचा दावा केला आहे. इराणच्या सीमेवर असणाऱ्या दियाला येथेही इराकी सैन्य व इसिस बंडखोर यांच्यात लढाई सुरू आहे.
इराकमध्ये तिहेरी स्फोट : २५ ठार
By admin | Published: October 13, 2014 2:45 AM