भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. या राजकीय तणावादरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांना त्यांच्याच पक्षाचे खासदार चंद्र आर्य यांनी घरचा आहेर दिला आहे. काही कट्टरतावादी घटक हिंदू-कॅनेडियन लोकांवर हल्ला करत आहेत. तसेच त्यांना भारतात परत जाण्याची धमकी देत आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी कॅनडामधील सर्व लोकांना शांत आणि सतर्क राहण्याचे आणि कुठल्याही अप्रिय घटनेची सूचना एजन्सींना देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. चंद्र आर्य इंडो कॅनेडियन नेते आहेत. तसेच ते आणि पंतप्रधान जस्टिन ट्रुडो एकाच पक्षाचं प्रतिनिधित्व करतात.
आर्य यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर लिहिले की, काही दिवसांपूर्वी कॅनडामध्ये खलिस्तान आंदोलनाचा नेता आणि तथाकथित जनमत संग्रहाचं आयोजन करणारा सिख फॉर जस्टिसचा अध्यक्ष गुरपतवंत सिंग पन्नू याने हिंदू कॅनेडियन लोकांवर हल्ला केला आणि आम्हाला कॅनडा सोडून भारतात परत जाण्यास सांगितले होते.
कॅनेडियन खासदारांनी सांगितले की, मी अनेक हिंदू-कॅनेडियन लोकांकडून ऐकलंय की, ते या हल्ल्यानंतर भयभीत झालेले आहेत. मी त्यांना शांत आणि सतर्क राहण्याचं आवाहन करतो. कृपया हिंदूफोबियाच्या कुठल्याही घटनेची सूचना आपल्या स्थानिक कायदे प्रवर्तक एजन्सीना द्या.
आर्य यांनी पुढे सांगितले की, खलिस्तान आंदोलनातील नेते कॅनडामधील हिंदू लोकांनी क्रियेला प्रतिक्रिया द्यावी आणि कॅनडामध्ये हिंदू आणि शीख आमने-सामने यावेत यासाठी चिथावणी देत आहे. मात्र बहुतांश कॅनेडियन शीख हे खलिस्तानचं समर्थन करत नाही, हेही मी स्पष्ट करतो. बहुतांश कॅनेडियन शीख हे अनेक कारणांमुळे खलिस्तान आंदोलनाची सार्वजनिकपणे निंदा करू शकत नाही. मात्र ते हिंदू-कॅनेडियन समुदायाशी जोडले गेलेले आहेत. कॅनेडियन हिंदू आणि शीख कौटुंबिक नाती आणि समान सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत, असेही त्यांनी संगितले.