लास वेगास : रिपब्लिकन पक्षाचे सर्वात प्रबळ दावेदार असणारे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी नेवाडात कॉकसमध्ये बाजी मारली. यामुळे ट्रम्प यांची बाजू आणखी भक्कम झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना ४६ टक्के मतदान मिळाले. सिनेटर मार्को रुबिओ यांना २३.९ टक्के आणि टेड क्रूझ यांना २१.४ टक्के मतदान मिळाले, तर रिपब्लिकनचे अन्य उमेदवार निवृत्त न्यूरोसर्जन बेन कार्सन आणि जॉन कासिक यांना अनुक्रमे सहा आणि चार टक्के मतदान मिळाले.दरम्यान, आपल्या उत्साही समर्थकांना संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, एवढा मोठा विजय मिळेल, अशी अपेक्षा केली नव्हती. आता आम्ही देश जिंकणार आहोत. अर्थात, देश जिंकण्याची सुरुवात आम्ही केली आहे. ट्रम्प यांनी साऊथ कॅरोलिना आणि न्यू हॅम्पशायरमध्ये यापूर्वी विजय मिळविला आहे, तर हा तिसरा विजय आहे. वादग्रस्त विधाने करणारे रिपब्लिकनचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एक असेच विधान करून वाद ओढावून घेतला आहे. आपल्या समर्थकांवर आपला पूर्ण विश्वास असून, अगदी हत्या केली तरी हे समर्थक आपल्या अभियानापासून हटणार नाहीत, असे ट्रम्प म्हणाले. काही बेइमान लोकच आमच्या समर्थकांवर अविश्वास दाखवू शकतात, असे सांगून ते म्हणाले की, माझे समर्थक साथ सोडणार नाहीत. डिसेंबरमधील एका सर्व्हेक्षणानुसार ट्रम्प यांच्या समर्थकांपैकी ७० टक्के समर्थकांनी सांगितले होते की, आपण ट्रम्प यांच्याच सोबत आहोत, हे विशेष. ...तर हिलरी यांच्याविरुद्ध खटला : ट्रम्प आपण निवडून आल्यास हिलरी क्लिंटन यांच्याविरुद्ध खटला चालवू, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. हिलरी क्लिंटन या राज्याच्या सचिव असतानाही त्यांनी खासगी ई-मेल सर्व्हरचा उपयोग केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.या प्रकरणात क्लिंटन या दोषी आहेत, असे मला वाटते आणि त्या निर्दोष असतील, तर त्यांनी ते सिद्ध करावे, असे आव्हानही ट्रम्प यांनी दिले. रिपब्लिकनकडून वर्णद्वेष : सँडर्स रिपब्लिकनकडून वर्णद्वेष केला जात असल्याचा आरोप डेमोक्रॅटिकचे एक इच्छुक उमेदवार बर्नी सँडर्स यांनी केला आहे. ते म्हणाले की, अध्यक्ष ओबामा यांना अवैध ठरविण्यासाठी हा प्रचार सुरू आहे. साऊथ कॅरोलिनात टाऊन हॉलमध्ये सँडर्स यांना विचारण्यात आले की, ओबामा यांच्या जन्माचा मुद्दा उपस्थित करून ट्रम्प वर्णद्वेष करीत आहेत का? यावर बोलताना सँडर्र्स म्हणाले की, ओबामा यांच्याशी कोणी असहमत असू शकतो; पण अध्यक्षांनाचा अवैध ठरविणे हे देशासाठी घातक आहे.
ट्रम्प यांनी नेवाडातही बाजी मारली
By admin | Published: February 25, 2016 3:22 AM