योगेश मेहेंदळे, आॅनलाइन लोकमत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि प्रसारमाध्यमे कितीही पक्षपाती असली, तरीही ते जनमत बदलू शकत नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाले. बहुतांश प्रसारमाध्यमांनी जाहीरपणे ट्रम्पविरोधात भूमिका घेतली आणि हिलरी यांच्या विजयाचा चंग बांधला होता. प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ट्रम्प यांच्या तुलनेत हिलरी यांना अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न मीडियाने कसे केले याचा लेखाजोखाच यात मांडण्यात आला आहे. हिलरी क्लिंटन यांना तब्बल ८४ प्रसारमाध्यमांनी पाठिंबा जाहीर केला, तर ट्रम्प यांच्यामागे १० पेक्षा कमी प्रसारमाध्यमे उभी राहिली. प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या आदल्या दिवशीच्या पोलमध्ये हिलरी यांना ९५ टक्के पसंती दाखवण्यात आली होती. परंतु, अवघ्या १० ते १२ तासांतच हे पोलकर्ते उघडे पडले आणि पसंतीचा तराजू क्लिंटन यांना ५ टक्के व ट्रम्प यांना ९५ टक्के इतका झुकला.पक्षपातीपणाची काही उदाहरणे...ट्रम्पबद्दलच्या नकारात्मक व सकारात्मक बातम्या यांचे प्रमाण ११ - १ इतकं विषममीडिया रिसर्च सेंटर या संस्थेने एबीसी, सीबीएस व एनबीसी या प्रमुख प्रसारमाध्यमांचे विश्लेषण केले आणि अहवाल तयार केला.जुलै २९ ते आॅक्टोबर २० या कालावधीत ट्रम्प यांच्या संदर्भात ९१ टक्के उल्लेख नकारात्मक होते. ट्रम्प यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादविवादांवर प्रमुख वृत्तवाहिन्यांनी ४४० मिनिटे खर्ची घातली, तर हिलरीबाबतीत अवघी १८५ मिनिटे खर्ची घातली. ट्रम्प यांच्या महिलांबाबतच्या विधानांबाबत १०२ मिनिटे प्रसारण. क्लिंटन फाउंडेशन घोटाळ्याची चर्चा २४ मिनिटे. क्लिंटन यांनी खासगी सर्व्हर वापरल्याचे प्रकरण व ई-मेल घोटाळा यासाठी ४० मिनिटे दिली, जी ट्रम्प यांच्या महिलांसंदर्भातील विधानाच्या पाठपुराव्यासाठीच्या वेळेच्या निम्मीही नाहीत.ट्रम्प टॅक्स भरत नाहीत हे सांगण्यासाठी ३३ मिनिटांचा प्राइम टाइम देण्यात आला.
अर्थतज्ज्ञांची चिंता वाढली डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष होत असल्यामुळे उद्योगवर्तुळातून आणि अर्थतज्ज्ञांमधून नकारात्मक सूर आहे. त्यांची चिंताही वाढली आहे. ट्रम्प हे बेपर्वा व अननुभवी असल्याचे सांगितले जात आहे. अर्थतज्ज्ञांना असे वाटते की, ट्रम्प यांच्या अविचारीपणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळे येऊ शकतात. आधीच अडचणीत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेवरील ताण त्यामुळे वाढू शकतो. ट्रम्प यांच्या विजयानंतर कोसळलेला बाजार काय संदेश देतो हे तपासावे लागणार आहे. चीनबाबतही ट्रम्प यांनी संंघर्षाची भूमिका घेतली होती. तथापि, निवडणुकीपूर्वी आक्रमक असलेल्या ट्रम्प यांची विजयानंतरची भूमिका काहीशी मवाळ झालेली दिसते. देशाची एकजूट करण्याची शपथ त्यांनी विजयानंतर घेतली आहे. अमेरिकेतील एक अर्थतज्ज्ञ पॉल अॅशवर्थ यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे, ते म्हणतात की, अध्यक्ष म्हणून ट्रम्प कसे असू शकतील ते सांगता येणार नाही.
विश्वास ठेवावा का? ट्रम्प यांनी हिलरींचा दणदणीत पराभव केला आणि अमेरिकी प्रसारमाध्यमांना जनमताचा अंदाज आला नाही की त्यांनी जाणूनबुजून ट्रम्प यांना पाडण्यासाठी आपल्या संपूर्ण नेटवर्कचा वापर केला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे अमेरिकी प्रसारमाध्यमे तुमच्यासोबत असोत वा तुमच्या विरोधात, त्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.