ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २७ - रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री पाच राज्यांमध्ये विजय मिळवला. या विजयामुळे त्यांचा उमेदवारीवरील दावा अधिक बळकट झाला आहे. त्यांनी टेड क्रूझ आणि जॉन कासिच या आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात केली.
दुस-या बाजूला डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या हिलरी क्लिटंन यांना क्लीन स्वीप विजय मिळवता आला नाही. रोड आयलँड प्रांतात बर्नी सँडर्स यांनी विजय मिळवून क्लिंटन यांना निर्भेळ विजयापासून रोखले. पाच एप्रिलला विसकॉनसीनमध्ये क्रूझ यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर ट्रम्प यांनी विजयाचा मार्ग सापडला आहे.
त्यांनी पेनसिल्वेनिया, रोड आयलँड, कनेक्टिकट, डेलावेयर आणि मेरीलँण्ड या पाच राज्यांमध्ये विजय मिळवला. गृहराज्य न्यूयॉर्कपेक्षा अन्य राज्यांमध्ये त्यांनी मोठया मताधिक्क्याने विजयाची नोंद केली. दुस-या बाजूला हिलरी क्लिंटन यांनी प्रतिस्पर्धी सॅंडर्स यांच्यावर मेरीलँण्ड, डेलावारे आणि पेनसिल्वेनियामध्ये विजय मिळवला. पण रोड आयलँडमध्ये सँडर्स यांनी बाजी उलटवत क्लिंटन यांच्यावर मात केली.