नवी दिल्ली - अमेरिकेचे ड्रोन पाडल्यामुळे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प इराणवर चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे सध्या इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी सांगितले की, इराणवर अमेरिका हल्ला करणार होती पण या हल्ल्यात 150 नागरिक मारले गेले असते. युद्धाची परिस्थिती तयार झाली असती. त्यामुळे ट्रम्प यांनी निर्णय बदलला.
इराणच्या तीन ठिकाणांवर अमेरिकेकडून हल्ला करण्याची योजना बनविण्यात आली होती. या प्रकरणात इराणने म्हटलं आहे की, अमेरिकेच्या ड्रोनने इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्याने एयरस्पेस नियमांचे ते उल्लंघन आहे. त्यामुळे इराणकडून अमेरिकेचे ड्रोन पाडण्यात आलं. यावरुन ट्रम्प यांनी ट्विट करुन इराणने सर्वात मोठी चूक केली आहे असं म्हटलं होतं. डोनाल्ड ट्रम्पने मोजक्या शब्दात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे अमेरिकेने इराणला सूचक इशारा दिला असल्याचं बोललं जात होतं. इराण आणि अमेरिकेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत.
इराणमधून तेलाची निर्यात कमी होण्याची शक्यता लक्षात घेता तेलाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेकडून इराणवर कुटनीतीचा वापर केला जात आहे. तसेच इराणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र अमेरिकेला युद्ध नको होतं म्हणून चर्चेच्या माध्यमातून हे प्रकरण संपविण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे.
शुक्रवारी अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सने मुंबई ते नेवार्क मधील विमान उड्डाण सेवा रद्द केली आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा फटका भारतीय विमान प्रवाशांवर होणार आहे. मुंबईहून अमेरिकेला जाणारं विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून जात असल्याने अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. अमेरिका एअरलाइन्सने सांगितले की, इराणद्वारे अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. ही विमानसेवा पुन्हा कधी सुरु करण्यात येईल याबाबत आता काही सांगण्यात येत नाही. मात्र तणाव जोपर्यंत आहे मुंबई-नेवार्क विमान सेवा निलंबित करण्यात आली आहे.
इराणच्या सशस्त्र दलाने गुरुवारी जलसंधी येथील हवाई क्षेत्रात येणाऱ्या अमेरिकेच्या ड्रोनला पाडलं. या शक्तिशाली ड्रोनची किंमत जवळपास 1260 कोटी रुपये होती. इराण आर्मीच्या कमांडरने सांगितले की, संबंधित अमेरिकेचे ड्रोनने इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्याने ही कारवाई केली आहे. मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळून लावला आहे.