वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषीत केली आहे. परकीय शत्रूंपासून अमेरिकेच्या कॉम्प्युटर नेटवर्क्सना वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी हे पाऊल उचललं आहे. यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षेत अडचणी आणणाऱ्या परदेशी टेलिकॉम कंपन्यांची सेवा वापरता येणार नाही. ट्रम्प यांनी याबद्दलच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी दिली. व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या आदेशात कोणत्याही कंपनीचं नाव नमूद करण्यात आलेलं नाही. मात्र हुवेई कंपनीला लक्ष्य करण्यासाठी ट्रम्प यांनी आणबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत आणीबाणी लागू होताच हुवेईनं प्रतिक्रिया दिली. यामुळे केवळ अमेरिकन कंपन्यांचं आणि नागरिकांचं नुकसान होईल, असं हुवेईनं म्हटलं. हुवेईच्या उत्पादनांचा वापर चीनकडून नजर ठेवण्यासाठी केला जात असल्याची चिंता अमेरिकेच्या कंपन्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. हुवेईचं अमेरिकेतलं अस्तित्व कमी करण्यासाठी अमेरिकेच्या व्यापार मंत्रालयानं आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. व्यापार मंत्रालयानं हुवेईचा समावेश 'एन्टीटी यादी'त केला. यामुळे अमेरिकन कंपन्यांमधलं तंत्रज्ञान ताब्यात घेताना हुवेईला अमेरिकन सरकारची परवानगी घ्यावी लागेल. यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये आधीच व्यापार युद्ध सुरू आहे. त्यात आता यामुळे भर पडणार आहे.
सायबर हल्ल्याची भीती; ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आणीबाणी लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:51 AM