वॉशिंग्टन : सगळ्या जगाचे लक्ष लागलेल्या महाभियोग खटल्यातून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रिपब्लिकन्सचे नियंत्रण असलेल्या सिनेटमध्ये सुटका झाली आहे. या विजयामुळे ट्रम्प यांना या वर्षी होत असलेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय विजय मिळाला आहे. तरीही या महाभियोग खटल्यामुळे देशात दोन गट तयार झाले व करदात्यांचे दशलक्षावधी डॉलर्स खर्चही झाले.
ट्रम्प यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या आरोपात सिनेटमध्ये बुधवारी ट्रम्प यांच्या बाजूने ५२ व महाभियोग खटल्याच्या विरोधात ४८ मते पडली आणि काँग्रेसला अडथळे आणल्याच्या आरोपात ट्रम्प यांच्या बाजूने ५३ व विरोधात ४७ मते मिळाली. येत्या तीन नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठीची निवडणूक होत असून ट्रम्प यांना पदावरून दूर करण्याचा डेमोक्रॅटिक पक्षाचा निर्धार हा मते पक्षनिहाय पडल्यामुळे फसला.
डेमोकॅ्रटिक पक्षाकडे नेतृत्व असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजने गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी महाभियोगाच्या कलमांना मान्यता दिली होती. यावर्षी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचे डेमोकॅ्रटिक पक्षाचे संभाव्य प्रतिस्पर्धी व माजी उपाध्यक्ष जो बिडेन यांची बदनामी करण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनवर दडपण आणले असा त्यांच्यावर आरोप होता. युक्रेनला ट्रम्प यांनी या कामासाठी जवळपास ४०० दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत देऊ केली होती.
सिनेटमध्ये रिपब्लिकनचे अधिक सदस्य
ट्रम्प या महाभियोग खटल्यातून निर्दोष सुटले तरी पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू इच्छिणारे ते महाभियोग खटल्याला तोंड दिलेले पहिले अध्यक्ष बनले आहेत. ट्रम्प यांना पदावरून दूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज होती; परंतु १०० सदस्यांच्या सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे ५३ सदस्य असल्यामुळे हे काम कठीणच होते. ट्रम्प यांच्या महाभियोग खटल्याने देशात दोन समान तट पाडले होते, असे भाष्य ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केले.