ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 15 - दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पाकिस्तानला अमेरिकेकडून यापुढे सहजासहजी निधी मिळणार नाही. दरवर्षी अमेरिकेकडून पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढाईसाठी एक ठराविक रक्कम दिली जाते. यापुढे हा पैसा कुठे खर्च केला, कसा खर्च केला याचा पाकिस्तानला हिशोब द्यावा लागेल. अमेरिकेच्या प्रतिनिधीसभागृहात शुक्रवारी पाकिस्तानला दिल्या जाणा-या संरक्षण निधीसंदर्भातील अटी अधिक कठोर करण्यासाठी कायद्यामध्ये तीन दुरुस्त्या करण्यात आल्या.
651 अब्ज डॉलरच्या एनडीए कायदा 2018 मध्ये सुधारणा करण्यात आली. अमेरिकन काँग्रेसमध्ये 341 विरुद्ध 81 अशा आवाजी मतदानाने या तिन्ही दुरुस्त्या मंजूर झाल्या. अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाने केलेल्या या सुधारणानंतर यापुढे पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढाईत समाधानकारक प्रगती करुन दाखवावी लागेल. अमेरिकेकडून पाकिस्तानला जो निधी मिळतो तो निधी पाकिस्तान दहशतवाद संपवण्याऐवजी पोसण्यासाठी वापरतो असा आरोप अनेकदा झाला आहे.
आणखी वाचा
अनेक अमेरिकन सिनेटर्सनी याबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. एनडीए कायदातंर्गत पाकिस्तानला अमेरिकेकडून 1 ऑक्टोंबर 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत 40 कोटी अमेरिकन डॉलरची मदत मिळेल. पण पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध विशेषकरुन उत्तरवझरिस्तानात हक्कानी नेटवर्क विरुद्ध कारवाई करतोय हे दाखवून द्यावे लागेल. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाची खात्री पटल्यानंतरच पाकिस्तानच्या हाती हा निधी पडेल. पाकिस्तानने यापूर्वी त्यांना अमेरिकेकडून मिळणारा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरला आहे. भारताने अनेकदा पाकिस्तान त्यांना मिळणा-या मदतीचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा भागात गुरुवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्या आहेत. गुरुवारी पाकिस्ताने कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये असलेल्या नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कराचे जवान सुद्धा जशास तसे चोख प्रत्युत्तर दिले.