ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 2 - जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या दुष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पॅरिस क्लायमेट करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दुपारी अमेरिका या करारातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. अमेरिकेची ही भूमिका पर्यावरण संरक्षणासाठी काम करणा-या अनेक संघटनांसाठी एक धक्का आहे.
अमेरिकन जनतेच्या हिताचे रक्षण करणे माझे पहिले कर्तव्य आहे. पॅरिस क्लायमेट करारातून माघार घेत असलो तरी, नव्या तरतुदींसह पुन्हा करारामध्ये सहभागी होऊ किंवा नव्याने करार करु असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ओबामा यांच्या राजवटीत झालेला पॅरिस क्लायमेट करार अमेरिकेवर अन्यायकारक होता. नवीन करार अमेरिकेन जनता, कामगार आणि उद्योग यांच्या हिताचा असला पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. नवीन करार झाला तर चांगलेच आहे पण झाला नाही तरी फार काही बिघडत नाही अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.
पॅरिस करार म्हणजे अमेरिकेसाठी एक प्रकारची शिक्षा होती. या करारामुळे ऊर्जा स्त्रोतांवर निर्बंध आले होते. अमेरिकेचा आर्थिक प्रगतीचा वेग खुंटला होता. विशेष करुन उत्पादन क्षेत्राला याचा फटका बसत होता असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. करारातील ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाच्या तरतुदीचे पालन करावे लागत होते त्यामुळे जीडीपी आणि औद्योगिक रोजगार निर्मिती घटली होती असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेने अशा प्रकार तडकाफडकी माघार घेतल्यामुळे अन्य देशही मनमानी करुन पर्यावरण नियम धाब्यावर बसवू शकतात. 2015 मध्ये झालेल्या करारावर जगातील 195 देशांनी स्वाक्ष-या केल्या होत्या. निवडणूक प्रचारामध्ये ट्रम्प यांनी पॅरिस करारामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे कोटयावधीचे नुकसान होत असल्याचे म्हटले होते. हा करार म्हणजे अमेरिकेला आर्थिकदृष्टया कमकुवत करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे असे त्यांचे म्हणणे होते. मागच्या आठवडयात इटलीमध्ये झालेल्या जी-7 देशांच्या परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी पॅरिस करारातून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते.