सिंगापूर - संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ऐतिहासिक शिखर बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाही नेते किम ज्याँग उन रविवारी सिंगापूरमध्ये दाखल झाले. एक त्रयस्थ देश या नात्याने यजमानपद करणारे सिंगापूर या बैठकीसाठी २० दशलक्ष सिंगापूर डॉलर खर्च करणार आहे.उत्तर कोरियाचे सत्ताधीश झाल्यापासून प्रथमच सर्वाधिक लांबचा विमान प्रवास करून किम एअर चायनाच्या विमाने प्योंग्यागहून सकाळी येथे पोहोेचले. जी-७ देशांच्या शिखर परिषदेसाठी कॅनडात गेलेले ट्रम्प थेट तेथून आले.सिंगापूरच्या सेंटोसा बेटावर मंगळवारी दोघांची बैठक व्हायची आहे. हे दोन शीर्षस्थ नेते प्रथमच भेटणार आहेत. कोरियन उपखंड अण्स्त्रमुक्त करणे हा या बैठकीचा अंतस्थ हेतू असला तरी तो कितपत सफल होईल याविषयी साशंकता आहे. कॅनडाहून रवाना होताना स्वत: ट्रम्प म्हणाले की, ऐनवेळी उत्स्फूर्तपणे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर या बैठकीचे फलित अवलंबून असेल. (वृत्तसंस्था)
ऐतिहासिक बैठकीसाठी ट्रम्प, किम सिंगापूरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 5:06 AM