वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना ट्विटरने मोठा धक्का दिला आहे. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. ट्विटरने भविष्यातही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये, दंगली केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचे ट्विटर खाते कायमस्वरुपी बंद केले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी गेल्या गुरुवारी अमेरिकेची संसद कॅपिटॉल बिल्डींगमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केली होती. या हिंसाचारात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला.
दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होईपर्यंत त्यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट बंद राहील. त्यामुळे ट्रम्प पुढील दोन आठवडे फेसबुक, इन्स्टाग्रामवर काहीही पोस्ट करू शकणार नाहीत. तसेच, दोन आठवड्यांत ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेल. त्यानंतर ज्यो बायडन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. यानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू होण्याची शक्यता आहे.
अमेरिकन संसदेवर ट्रम्प समर्थकांचा धुडगूसराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) प्रचंड धुडगूस घातला. कॅपिटल हिलवर झालेल्या या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला. जगातील सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झाल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. दरम्यान, अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील मतमोजणीवरुन डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आक्रमक झाले होते. ट्रम्प समर्थकांनी मतमोजणी रोखण्याचा प्रयत्न करत कॅपिटॉल बिल्डींगमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रम्प समर्थक आक्रमक झाले आणि हिंसेला सुरुवात झाली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत महाभियोग? डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्ला चढविल्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे. ट्रम्प यांना राष्ट्रध्यक्षपदावरून तातडीने हटविण्याबाबत सर्व कायदेशीर मार्गांचा विचार करण्यात येत आहे. तसे न झाल्यास त्यांच्यावर महाभियोग चालविण्याचा इशाराही प्रतिनिधी सभेने दिला आहे. तर दुसरीकडे अध्यक्षीय अधिकारांचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:ला माफ करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.