झेलेन्स्की यांचा कॉल ट्रम्प यांनी स्पीकरवर टाकला! सोबत होते इलॉन मस्क; त्या 7 मिनिटांत काय-काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 11:40 AM2024-11-09T11:40:58+5:302024-11-09T11:42:33+5:30
निवडणुकीच्या पहिल्याच संबोधनात ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना 'सेल्समन', म्हटले होते.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयानंतर जगभरातील अनेक नेते डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा देत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी शुभेच्छा देण्यासाठी ट्रम्प यांना फोन केला होता. यावेळी ट्रम्प आणि इलॉन मस्क सोबतच होते. मस्क यांनीही झेलेन्स्की यांच्यासोबत संवाद साधला. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार चर्चा सकारात्मक राहिली.
सात मिनिटे चालला कॉल -
माध्यमांतील वृत्तांनुसार, ट्रम्प Mar-a-lago या आपल्या निवासस्थानी इलॉन मस्क यांच्यासोबत होते. याचवेळी झेलेन्स्की यांचा ट्रम्प यांना शुभेच्छा देण्यासाठी कॉल आला. ट्रम्प यांनी फोन स्पीकर मोडवर केला. यावेळी ट्रम्प यांच्याबरोबरच मस्क यांनीही झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा केली. झेलेन्स्की यांनी रशियाविरोधातील युद्धात युक्रेनला स्टारलिंकच्या माध्यमाने कम्युनिकेशनची सुविधी निर्माण करून दिल्याबद्दल मस्क यांचे आभार मानले.
माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हा कॉल साधारणपणे 7 मिनिटे चालला. यात कसल्याही प्रकारच्या पॉलिसीसंदर्भात चर्चा झाली नाही. यासंदर्भात झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत, झेलेन्स्की यांनी बुधवारी ट्रम्प यांना फोन केला आणि विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या, असे लिहिले आहे.
झेलेन्स्की यांना 'सेल्समन' म्हणाले आहेत ट्रम्प -
खरे तर, अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या झालेल्या विजयाने युक्रेनचे टेन्शन वाढू शकते. कारण, रशियासोबत गेल्या साधारणपणे तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेन परदेशी लष्करी मदतीवर अवलंबून आहे. यात अमेरिका युक्रेनला मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे. याच वेळी, रशियासोबत सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला मिळणाऱ्या अमेरिकन लष्करी आणि आर्थिक मदतीवर ट्रम्प यांनी टीका केली होती.
निवडणुकीच्या पहिल्याच संबोधनात ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना 'सेल्समन', म्हटले होते. तसेच बायडेन प्रशासनावर अमेरिकन नागरिकांच्या टॅक्सचा पैसा त्यांच्यावर खर्च करण्याऐवजी, युद्धात दुसऱ्या देशांना मदत करण्यासाठी खर्च करत आहेत.