वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या दोन दिवसांच्या ‘अविस्मरणीय’ भेटीनंतर मायदेशी परतून चार दिवस उलटले तरी अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ या स्वागतपर कार्यक्रमासाठी लोटलेल्या एक लाखांहून अधिक लोकांच्या गर्दीचे गारुड त्यांच्या मनातून अद्याप गेलेले नाही. किंबहुना एवढी अलोट गर्दी अनुभवल्यानंतर आता अमेरिकेतील काहीशे किंवा काही हजारांच्या सभांपुढे बोलण्यात त्यांना मजा वाटेनाशी झाली आहे!दक्षिण कॅरोलिना राज्यात शनिवारी संध्याकाळी प्रचाराच्या एका सभेत बोलताना ट्रम्प यांनी आपली ही मानसिक अवस्था उघडपणे बोलून दाखविली. या सभेला सुमारे १५ हजार लोक हजर होते.ट्रम्प म्हणाले, काही दिवसांपूर्वी मी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत होतो. मोदी जनतेची लाडकी अशी थोर व्यक्ती आहे. तेथे मी थक्क करणारी गोष्ट अनुभवली. सभेला गेलो आणि प्रचंड गर्दी पाहूनच अचंबित झालो. एरवी इथे इतरांपेक्षा माझ्या सभांना मोठी गर्दी होते, असे मला वाटायचे; पण भारतामधील ती गर्दी अनुभवल्यानंतर आता येथील काही हजारांच्या सभेपुढे बोलण्यातही मजा नाही, असे वाटू लागले आहे!ट्रम्प पुढे म्हणाले, भारतातील त्या गर्दीचा अनुभव घेतल्यानंतर आता यापुढे मला (येथील) कोणत्याही सभेच्या गर्दीचे अप्रूप वाटणार नाही; पण मला तेथील गर्दीप्रमाणेच येथील कमी गर्दीही हवीशी वाटते; पण एक मात्र नक्की सांगतो, भारतीयांना एक महान नेता मिळाला आहे व तेथील लोकांचे आपल्यावर खूप प्रेम आहे. >तालिबान नेत्यांशी लवकरच चर्चा -ट्रम्पवॉशिंग्टन : तालिबानच्या नेत्यांशी आपण लवकरच चर्चा करणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. दहशतवादाविरुद्धचे युद्ध आता अन्य कोणी लढावे. विशेषत: त्या क्षेत्रातील देशाने ही लढाई लढावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, तालिबानच्या नेत्यांशी लवकरच चर्चा करू. त्यांनी जे सांगितले त्यावर ते अंमलबजावणी करतील, अशी आशा करूया. ते दहशतवाद्यांचा खात्मा करतील. ही लढाई ते सुरूच ठेवतील. अफगाणिस्तानात अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आम्हालामोठे यश मिळाले. पण, एवढ्या वर्षांनंतर आता वेळ आली आहे की, आपल्या लोकांना परत घरी बोलवायला हवे. अमेरिका आणि तालिबान यांनी दोहामध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यानुसार अमेरिका १४ महिन्याच्या आत आपले सैनिक अफगाणिस्तानातून परत बोलविणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, लहान सभांपुढे बोलण्यात मजा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 6:31 AM