वॉशिंग्टन : विदेशी कर्मचाऱ्यांबाबत आक्रमक आणि कठोर भूमिका घेणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नरमले असल्याचे दिसून येत आहे. विदेशी प्रवाशांच्या ‘गुणवत्तेवर आधारित’ स्थलांतर पद्धतीवर त्यांनी भर दिला. त्यामुळे भारतासारख्या देशातील उच्च शिक्षितांना लाभ मिळू शकतो, असेही ते म्हणाले. काँंग्रेसच्या पहिल्या संबोधनात ट्रम्प म्हणाले की, आॅस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशांनी विदेशी प्रवाशांबाबत गुणवत्तेवर आधारित स्थलांतर पद्धती स्वीकारली आहे. यामुळे काही डॉलरची बचत होईल आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही वाढेल. दिवंगत अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, लिंकन यांचे विचार योग्य होते. त्यांच्या विचारांकडे लक्ष देण्याची हीच योग्य वेळ आहे. अमेरिकेत येण्यासाठी ज्या सात देशांच्या नागरिकांना बंदी घालण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजूर केलेला आहे. त्या देशांच्या यादीतून इराकला वगळण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)>गोळीबाराचा निषेध वॉशिंग्टन : भारतीय इंजिनिअरवरील गोळीबार प्रकरणी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले मौन सोडत या घटनेचा निषेध केला आहे. अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत बोलताना ट्रम्प यांनी ही घटना व्देष व दुष्ट भावनेने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. ज्यूच्या केंद्रांना देण्यात आलेल्या धमक्या आणि इतर धर्मीयांच्या स्थळांवर झालेली तोडफोड यांचा संदर्भ देऊन ट्रम्प म्हणाले की, धोरणांच्या बाबतीत आमच्यात मतभेद असू शकतात. पण, व्देष आणि वाईट शक्तीविरुद्ध आम्ही एकत्र उभे आहोत. >भारतीयांच्या काळजीत भर न्यूयॉर्क : ट्रम्प यांचे धोरण आणि कन्सासमधील भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचीभोटला यांच्यावर झालेला गोळीबार या घटनांमुळे येथील भारतीय नागरिकांच्या काळजीत भर पडत आहे. फ्लोरिडात प्रमुख आयटी कंपनीत काम करणारे ३४ वर्षीय व्यंकटेश यांनी सांगितले की, गेली दहा वर्षे ते अमेरिकेत आहेत. त्यांना ग्रीन कार्ड मिळणारही होते. पण, आता त्याबाबत ते साशंक आहेत, कारण, ट्रम्प प्रशासन व्हिसा धोरणात बदल करत आहे.>ट्रम्पच्या भाषणाला विदेशी मुस्लीम ट्रम्प यांच्या विदेशी धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यास डेमोक्रॅटिक सदस्यांनी संयुक्त संबोधनाच्या बैठकीत विदेशी मुस्लीम नागरिकांना बोलविले. यात भारतीय, पाकिस्तान, बांग्लादेशच्या नागरिकांचा समावेश होता. डेमोक्रॅटिकचे सदस्य रुबेन किहुएन म्हणाले की, विदेशी नागरीक येथे ‘अमेरिकन स्वप्नांसाठी’ काम करतात. अर्थव्यवस्थेला ते मजबूत बनवतात. काँग्रेसचे सदस्य जिम लेंजविन म्हणाले की, विविधता आमच्या देशाला मजबूत बनवते. ही विविधता टिकवायला हवी.
ट्रम्प नरमले; गुणवत्तेवर आश्रय
By admin | Published: March 02, 2017 4:24 AM