वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांना सत्ता हस्तांतरण करण्याची तयारी दर्शविली आहे. बायडेन यांना सत्ता हस्तांतरण करण्यासाठी तयारी करा, असे निर्देश ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
विशेष म्हणजे, सत्ता हस्तांतरणासाठी जबाबदार असलेल्या संघीय एजन्सी जीएसएच्या प्रमुखांनी म्हटले होते की, बायडेन यांना व्हाइट हाऊसमध्ये येण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू. त्यानंतर ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत. अर्थात, ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, लढाई सुरूच ठेवू आणि विजय प्राप्त करू. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी बायडेन आणि उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांचा विजय झाला आहे.
ट्रम्प म्हणाले, आमची लढाई सुरूच राहील..जनरल सर्व्हिस ॲडमिनिस्ट्रेटर (जीएसए) एमिली मर्फी यांनी बायडेन यांना पत्र लिहून ट्रम्प सत्ता हस्तांतरणासाठी प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार असल्याचे सांगितल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी याबाबत ट्वीट केले की, एमिली मर्फी यांचे देशाप्रती असलेले समर्पण आणि निष्ठा यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांना त्रस्त करण्यात आले. धमक्या देण्यात आल्या. असे कुणाच्याही बाबतीत होऊ नये, असे मला वाटते. आमची लढाई सुरूच राहील.