वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला धमकीवजा इशारा दिला आहे. ''अमेरिकन आयातीवरचा कर घटवा नाहीतर तुमच्यावरही तसाच कर लादू", असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. '' दुस-या देशांच्या तुलनेत अमेरिकेकडून सामानांच्या आयतीवरील कर कमी प्रमाणात लावला जातो, मात्र दुसरे देश आमच्या सामानांवर जास्त कर लावत आहेत. त्यामुळे हे देश जर कर घटवणार नसतील तर आम्हीदेखील तसाच कर लादू'', असा धमकीवजा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'नेशन फर्स्ट' या धोरणाला अनुसरून एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर मोठ्याप्रमाणावर कर लादला आहे. फक्त कॅनडा आणि मेक्सिको या दोन देशांना यामधून सूट देण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ माजली असून त्यामुळे भविष्यात जागतिक व्यापारयुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकन उद्योगांना काही चुकीच्या व्यापार धोरणांमुळे झळ सोसावी लागत आहे. स्टील आणि अॅल्युमिनियच्या आयातीवर कर लादल्याने या क्षेत्रातील अमेरिकन उद्योगांना चालना मिळेल, असे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, अनेक देशांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे पडसाद उमटू शकतात. भारतालाही याचा खूप मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भविष्यात जागतिक व्यापारयुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या नव्या धोरणानुसार पोलादावर 25 टक्के आणि अॅल्युमिनियमवर 10 टक्के इतका कर आकारला जाईल. येत्या 15 दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होईल. फक्त कॅनडा आणि मेक्सिको या दोन देशांना यामधून वगळण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाला रिपब्लिकन पक्षातील अनेक सिनेटर्स आणि अमेरिकेशी व्यापारी भागीदारी असणाऱ्या कंपन्यांनी विरोध केला आहे. मात्र, ट्रम्प यांनी आमचे सरकार अधिक निपक्षपाती आमि लवचिक होत असल्याचे म्हटले. निवडणुकीच्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार आमचे सरकार अमेरकिन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.