न्यू यॉर्क : अमेरिकेचे नवर्विाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या ट्रम्प टॉवरमध्ये एक बेवारस बॅग दिसताच, तिथे काम करणारे कर्मचारी हादरून गेले, तर संपूर्ण न्यू यॉर्कमध्ये खळबळ माजली. न्यू यॉर्कमधील बॉम्बनाशक पथक, पोलीस आणि अग्निशामक दलाने घाईघाईने संपूर्ण ट्रम्प टॉवरची इमारत रिकामी केली. पण त्या बेवारस बॅगेत काही खेळणी असल्याचे आढळून आले. याच ट्रम्प टॉवरमध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पेंटहाऊस आहे. न्यू यॉर्कच्या पोलीस विभागाचे सहायक आयुक्त जे. पीटर डोनाल्ड यांनी बॅगेतील खेळण्यांची माहिती मिळण्याआधीच टिष्ट्वट केले आहे की, बॉम्बनाशक पथक सावधानतेने ट्रम्प टॉवरमध्ये कार्यवाही करीत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, अधिकारी लोकांना या इमारतीच्या बाहेर पडण्यास सांगत आहेत, तर लोकही येथून बाहेर पळताना दिसत आहेत. दुपारनंतर पावणेपाचच्या सुमारास नागरिकांना येथून बाहेर काढण्यात आले. ट्रम्प यांच्या प्रतिनिधी मंडळाचे प्रवक्ते सीन स्पाइसर यांनी सांगितले की, या भागात एक बेवारस बॅग मिळाली. यात खेळणी आहेत. त्यानंतर स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी टिष्ट्वट केले आहे की, संशयित बॅग मिळाल्यानंतर आता परिस्थिती सामान्य आहे. या घटनेच्या वेळी ट्रम्प या टॉवरमध्ये नव्हते, तर फ्लोरिडात होते. (वृत्तसंस्था)सुरक्षेसाठी ४ लाख डॉलर्स खर्चएका अज्ञात लहान मुलाने मिडटाऊनच्या मागे बॅग ठेवली होती. हा मुलगा आपल्या कुटुंबासोबत होता. तो खेळता खेळता, बॅग विसरून गेला असावा, असा अंदाज असल्याचे सांगण्यात आले. ट्रम्प टॉवर ही ५८ मजली इमारत आहे. ट्रम्प यांच्या मोहिमेचे हे मुख्यालय होते. मात्र काही लोकांनी टिष्ट्वटरवर या घटनेची खिल्लीही उडविली. ही बॅग आता नष्ट करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात आता सुरक्षा अधिक वाढविण्यात आली आहे. सध्या येथे सुरक्षेसाठी प्रतिदिन चार लाख अमेरिकन डॉलर एवढा खर्च करण्यात येतो.
बेवारस वस्तूमुळे ट्रम्प टॉवर रिकामा
By admin | Published: December 29, 2016 12:34 AM