वॉशिंग्टन : जॉर्ज प्लॉईड (George Floyd) या ४२ वर्षांच्या कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गळा दाबून खून केल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत उसळलेली संताप व निषेधाची लाट व्हाईट हाऊसच्या अगदी दारात पोहोचली. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उसळलेल्या हिंसक आंदोलनावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
डोनाल्ड म्हणाले, "आपली राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या संरक्षणासाठी वेगवान आणि निर्णायक कारवाई करणार आहे. दंगल आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी लष्काराचे हजारो सैनिक, कर्मचारी आणि अंमलबजावणी अधिकारी पाठवत आहे. तसेच, परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अमेरिकेत यापूर्वीच राष्ट्रीय गार्ड तैनात करण्यात आले आहेत."
याचबरोबर, डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्ज प्लॉईड आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार असल्याचेही सांगितले. ते म्हणाले, "जॉर्ज प्लॉईड आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ. जॉर्जच्या दुर्देवी हत्येमुळे सर्व अमेरिकन दु: खी झाले आहेत. माझे पहिले आणि मुख्य कर्तव्य म्हणजे मी देश आणि अमेरिकन लोकांना सुरक्षा देण्याचे आहे. मी शांततापूर्ण निदर्शनास संतप्त जमावात बदलू देऊ शकत नाही. या दंगलीमुळे निष्पाप लोकांचा सर्वाधिक बळी गेला आहे."
आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉशिंग्टन डीसी येथे लष्कराची एक बटालियन तैनात करण्यात आली आहे. जवळपास २५० जवान परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. हिंसक आंदोलनादरम्यान सुमारे चार हजार लोकांना अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये सोमवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ११ ते मंगळवार सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे.
दरम्यान, जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या या संतापाचे, आंदोलनाचे लोण अमेरिकेतील १४० शहरांमध्ये पसरले असून, या परिस्थितीमुळे किमान ४० शहरांमध्ये संचारबंदी पुकारण्यात आली आहे.
आसऱ्याची ५० वर्षांतील पहिली वेळदहशतवादी हल्ल्यासह अन्य काही आणीबाणीचा प्रसंग उद््भवला तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी या अभेद्य बंकरची सोय केलेली आहे. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळात राष्ट्राध्यक्षांना या बंकरचा आसरा घेण्याची वेळ प्रथमच आली. एवढेच नव्हे तर वॉशिंग्टन डीसी या राजधानी क्षेत्रात सुरक्षा दलांनी लागू केलेली सतर्कता ९/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या तोडीची होती. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे नेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यू.) यांच्या हत्येनंतर सन १९६७ मध्ये उसळलेल्या सामाजिक असंतोषानंतर आताचा अमेरिकेतील उद्रेक तीव्र व व्यापक असल्याचे मानले जात आहे.
...आणि पोलिसांनी गुडघे टेकले जॉर्ज प्लॉईड यांच्या मृत्युनंतर अमेरिकेत निदर्शने सुरु आहेत. एका रॅलीदरम्यान या पोलिसांनी अक्षरश: गुडघे टेकविले.