वॉशिंग्टन : सात विकसित देशांच्या ‘जी-७’ या गटाची कल्पना ‘कालबाह्य‘ झालेली असल्याने या गटात भारतासह काही नवे सदस्य घेऊन या गटाचा ‘जी-१०’ किंवा ‘जी-११’ असा विस्तार करण्याची कल्पना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली आहे. या गटात भारतासह आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व रशिया या देशांचा समावेश करावा, असे ट्रम्प यांना वाटते.
फ्लोरिडाहून वॉशिंग्टनला परत येताना विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी हा विचार बोलून दाखविला. मुळात या गटाची ‘जी-४’ म्हणून स्थापना सन १९७३ मध्ये झाली तेव्हापासून जग खूप बदलले आहे. आता या गटाचे स्वरूप बदलून ते जगातील वास्तवाशी अनुरूप करायला हवे, असे ट्रम्प यांचे म्हणणे होते.
ज्या नव्या देशांचा या गटात समावेश व्हावा असे आपल्याला वाटते त्या देशांच्या नेत्यांशी आपण आपल्या मनातील या कल्पनेविषयी बोललो आहोत, असे ट्रम्प म्हणाले.मात्र, अशी फेररचना प्रत्यक्षात केव्हा मूर्तरूप घेऊ शकेल, याचा नक्की कालावधी सूचित न करता ट्रम्प म्हणाले, बहुधा निवडणुकीनंतरच हे शक्य होईल.भारताच्या मनीषेला बळजगातील उगवती महाशक्ती या नात्याने आपल्याला प्रमुख देशांच्या पंक्तीत स्थान मिळावे, ही भारताचीही मनीषा आहे. भारताला ‘जी-७’ बरोबरच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही स्थायी सदस्यत्व हवे आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा हा विचार भारताला अनुकूल असाच आहे. सध्या या गटात असलेल्या सातपैकी कॅनडा, इटली, फ्रान्स आणि ब्रिटन या चार देशांपेक्षा भारताचा ‘जीडीपी’ जास्त आहे.