कोलंबिया : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले वादग्रस्त डोनाल्ड ट्रम्प यांनी साऊथ कॅरोलिनात प्रायमरीत बाजी मारली आहे, तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीच्या दावेदार हिलरी क्लिंटन यांनी नेवाडात आयोजित कॉकसमध्ये आपले प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांच्यावर निसटता विजय मिळविला आहे. या महिन्यात सुरुवातीला न्यू हॅम्पशायरमध्ये प्रायमरीत जिंकलेले ट्रम्प आयोवात कॉकसमध्ये दुसऱ्या स्थानावर होते. हा विजय ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण मंगळवारी नेवाडात रिपब्लिकन कॉकस होणार आहे, तर १ मार्च रोजी १३ राज्यांत मतदान होणार आहे. रिपब्लिकन पक्षाकडून मैदानात असलेल्या प्रमुख उमेदवारांत मार्को रुबियो आणि टेक्सासचे सिनेटर टेड क्रूज यांचा समावेश आहे. दरम्यान, साऊथ कॅरोलिनात विजय मिळविल्यानंतर येथे बोलताना ट्रम्प म्हणाले की, येथील नागरिकांचे मी आभार मानतो. ट्रम्प यांना ३२.५, तर रुबियो यांना २२.५ टक्के मते मिळाली, तर क्रूज यांना २२.३ टक्के मते मिळाली. डेमोक्रॅटिकच्या हिलरी क्लिंटन यांनी नेवाडातील कॉकस अतिशय कमी अंतराने जिंकले. हिलरी यांनी सँडर्स यांना ५ टक्क्यांहून अधिक मतांनी हरविले. हा नागरिकांचा विजय असल्याचे टिष्ट्वट क्लिंटन यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)बुश यांची माघार..1 ) अमेरिकेतील मोठ्या परिवारातील एक इच्छुक उमेदवार फ्लोरिडातील माजी गव्हर्नर जेब बुश यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. 2 ) जेब बुश हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांचे चिरंजीव, तर जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचे भाऊ आहेत. साऊथ कॅरोलिनात त्यांना एकूण रिपब्लिकन प्रायमरी मतदारांचे ८ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली. ते म्हणाले की, आज रात्री मी माझे अभियान थांबवीत आहे. आयोवात १ फेब्रुवारीला झालेल्या कॉकसमध्ये ते सहाव्या स्थानावर होते.
कॅरोलिनात ट्रम्प यांची बाजी; नेवाडात क्लिंटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 1:30 AM