ऑनलाइन लोकमत
अमेरिका, दि. 19 - राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातील अखेरच्या क्षणी बराक ओबामांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेशी संवाद साधला. माझ्या हृदयाला वाटतं आता सगळं काही नीट होत आहे. आम्हीही ठीक आहोत, असे ते म्हणाले आहेत. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अंतिम परिषदेत ते बोलत होते. ओबामांच्या संमेलनाला पाच डझनांहून अधिक रिपब्लिकन नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही इशारा दिला आहे. इस्रायल-पॅलेस्टिनींच्या मुद्द्यावर एकांगी भूमिका न घेण्याचा सल्ला त्यांनी ट्रम्प यांना दिला आहे. आम्ही सतत काम करत आणि लढत राहू. कधीही कोणाला गृहीत धरणार नाही, मला माहीत आहे या कार्यात तुम्हीही आमची मदत कराल, असं ते पत्रकारांना उद्देशून म्हणाले आहेत. डेमोक्रटिक पक्षाकडून मी दोनदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालो. मात्र मी अमेरिकेतल्या जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहिलो. माझा माझ्या देशावर आणि अमेरिकन नागरिकांवर विश्वास आहे. मला वाटतं वाईट माणसांपेक्षा चांगली माणसं जास्त आहेत, असंही ते म्हणाले आहेत. विकिलिक्सला संवेदनशील दस्तावेज देणा-या चेल्सिया मॅनिंग यांची शिक्षा कमी केल्याच्या निर्णयाचंही त्यांनी समर्थन केलं आहे. मी रशिया आणि इतर देशांना आण्विक शस्त्रास्त्रे कमी करण्यासंदर्भात केलेल्या प्रचाराला आणि प्रयत्नाला यश आल्याचंही समाधान त्यांनी व्यक्त केलं आहे. जगाच्या हितासाठी अमेरिका आणि रशियाचे संबंध सुधारणे गरजेचे आहे, असंही मत बराक ओबामांनी मांडलं आहे.