ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतावर स्तुतीसुमने उधळणारे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार 'डोनाल्ड ट्रम्प' आता मोदींच्या घोषणांचीही कॉपी करू लागल्याचे दिसत आहे. ज्याप्रमाणे मोदींनी 2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी 'अब की बार मोदी सरकार'चा नारा दिला होता, त्याचप्रमाणे मोदींनी दिलेल्या ना-याची नक्कल करत ट्रम्पदेखील 'अब की बार ट्रम्प सरकार' असे म्हणत आहेत. यासंदर्भातील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मात्र हा व्हिडीओ अधिकृतरित्या ट्रम्प यांच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे की नाही, याबाबतची माहिती कळू शकलेली नाही. कारण 'अब की बार ट्रम्प सरकार'चा नारा देत असताना ट्रम्प यांचा आवाज आणि त्याचे उच्चार करतानाचा व्हिडीओतील भाग एकमेकांशी जुळताना दिसत नाही.
आणखी बातम्या
दरम्यान, अमेरिकेत राहणा-या भारतीयांची मते मिळवण्यासाठी ट्रम्प पंतप्रधान मोदींचा, त्यांच्या घोषणांचा आधार घेत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारतवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, 'अब की बार ट्रम्प सरकार'चा नारा लावला आहे.
याआधीही ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केले होते. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आर्थिक सुधारणा आणि प्रशासकीय बदल घडवून देशाला विकासाच्या वाटेवर नेत आहेत. त्यांच्यासारखेच काम अमेरिकेतही करण्याची गरज आहे', असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी 16 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. 'मी नरेंद्र मोदी यांचा चाहता असून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी इच्छुक आहे', असेही ते म्हणाले. रिपब्लिकन हिंदू कोएलिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले होते.