वॉशिंग्टन : सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर तुम्हा प्रसिद्धी माध्यमांची प्रतिष्ठा लयाला गेली आहे. त्यामुळे तुम्ही तोंड बंद ठेवलेलेच बरे, अशा शब्दांत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रमुख सल्लागाराने मुख्य प्रवाहातील माध्यमांना दटावले आहे. ट्रम्प मुख्य प्रवाहातील माध्यमांचा उल्लेख अनेकदा विरोधी पक्ष असाच केला आहे. माध्यमांनी थोडी लाज बाळगावी आणि काही काळ आपले तोंड बंद ठेवावे, असे ट्रम्प यांचे व्हाईट हाऊसमधील प्रमुख सल्लागार स्टीफन के बॅनन पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी त्यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चा उल्लेख केला. तुम्ही माझे म्हणणे जरूर प्रसिद्ध करा. माध्यमे येथे विरोधी पक्ष बनली आहेत. त्यांना हा देश समजत नाही. ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष का आहेत हे त्यांना अद्यापही समजून घेता आलेले नाही, असेही ते म्हणाले. ट्रम्प यांच्या विजयात बॅनन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अभिजात माध्यमांनी त्यांच्या प्रचार मोहिमेचे चुकीच्या पद्धतीने वार्तांकन केले. माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने काम केले. १०० टक्के अयोग्य पद्धतीने. माध्यमांचा अपमानास्पद पराभव झाला असून, ते तो कधीही विसरू शकणार नाहीत. माध्यमांनी आमच्या प्रचार मोेहिमेचे वार्तांकन करणाऱ्या एकालाही नोकरीवरून काढले नाही, असेही ते म्हणाले. तुम्ही उघडे पडला आहात. माध्यमांकडे प्रामाणिकपणा नाही. समज नाही आणि ते परिश्रमही करीत नाहीत. तुम्ही विरोधी पक्ष आहात. डेमोक्रॅटिक पार्टी विरोधी पक्ष नाही. तुम्ही आहात. माध्यमे आहेत विरोधी पक्ष, असेही ते म्हणाले.
ट्रम्पचे सल्लागार माध्यमांवर घसरले
By admin | Published: January 28, 2017 12:53 AM