कैरो : जेरूसलेम शहराला इस्रायलची राजधानी म्हणून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मान्यता अमेरिकेने रद्द करावी, अशी मागणी अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रविवारी येथे केली.ट्रम्प यांच्या त्या निर्णयामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकाही बळकावणाºयाच्या बाजूने आली असून, त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाले आहे, असे या मंत्र्यांनी म्हटले.ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध करणारा ठराव संमत करावा, असे आवाहन त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला केले, परंतु अमेरिका अशा ठरावावर नकाराधिकार वापरेल, असेही त्यांनी म्हटले. अमेरिकेने जर नकाराधिकार वापरला, तर अरब देश तसाच ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ठेवतील, असे पॅलेस्टाइनचे परराष्ट्रमंत्री रियाद अल-मलिकी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या परराष्ट्रमंत्र्यांच्या तातडीने बोलावलेल्या व शनिवारी रात्री सुरू झालेल्या या बैठकीत दोन पानांचा ठराव संमत करण्यात आला. मात्र, ठरावात अमेरिकेवर दंडाची कारवाई (उदा. अमेरिकेच्या उत्पादनांवर बहिष्कार किंवा अमेरिकेशी असलेले संबंध तोडणे) करण्याच्या उपायांचा समावेश नाही.
ट्रम्प यांचा निर्णय मागे घ्यावा, अरब मंत्र्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 1:33 AM