Turkey earthquake : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपाला 60 तासांहून अधिक काळ लोटला असला तरी मृतांचा आकडा अद्याप थांबलेला नाही. दोन्ही देशांतील मृतांचा आकडा 11 हजारांच्या पुढे गेला आहे. तुर्कीमध्ये आतापर्यंत 8574 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सीरियामध्ये 2530 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी भूकंपग्रस्त भागाला भेट दिली आहे.
भूकंपानंतर सरकारने योग्यरित्या परिस्थिती हाताळली नाही, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. सर्वात जास्त नुकसान झालेल्या भागातील कुटुंबांनी सांगितले की, बचाव कार्याचा वेग मंदावला आहे, त्यामुळे ढिगाऱ्यात अडकलेल्या त्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढण्यात मदत होऊ शकली नाही. एर्दोगान यांनी कबूल केले की सुरुवातीला बचाव कार्यात अडचणी आल्या, परंतु खराब झालेले रस्ते आणि विमानतळांमुळे विलंब झाल्याचे ते म्हणाले.
तुर्कस्तानच्या भूकंपग्रस्त भागात आता सुमारे 60,000 मदत कर्मचारी कार्यरत आहेत, परंतु विध्वंस इतका व्यापक आहे की बरेच लोक अजूनही मदत पोहोचण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 2 डझनहून अधिक देशांतील मदत पथके तुर्कीच्या आपत्कालीन कर्मचार्यांसह काम करत आहेत आणि मदत पुरवठा सुरूच आहे. आम्ही आमच्या एकाही नागरिकांना रस्त्यावर सोडणार नाही, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. देशातील 8.5 कोटी लोकांपैकी 1.3 कोटी लोकांना याचा फटका बसला असून त्यांनी 10 प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर लोकांना हवामानाशीही झगडावे लागते. रात्रीच्या थंडीत लोकांना आश्रयस्थानात राहावे लागत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या गझियानटेपमधील तापमान -1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. येत्या काही दिवसांत गॅझियनटेपमध्ये रात्रीचे तापमान -7 अंशांपर्यंत असेल.तिथून सातत्याने असे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामध्ये ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढल्याचे दिसत आहे. तुर्की रेड क्रिसेंटचे प्रमुख केरेम किनिक म्हणाले की, पहिले 72 तास मदत आणि बचाव कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.