Turkey - तुर्की देशात सोमवारचा दिवस लोकांच्या आयुष्यात काळा दिन ठरला आहे. एकापाठोपाठ एक आलेल्या भूकंपाने तुर्की देश हादरला आहे. या दशकातील सर्वात मोठं संकट असल्याचं राष्ट्रपती रेसेप तैय्यप यांनी म्हटलं आहे. तुर्कीत भूकंपाने सगळं उद्ध्वस्त करून टाकलं असून या संकटात माणुसकीचं चित्रही पाहायला मिळत आहे.
तुर्कीत एका स्थानिक न्यूज चॅनेलच्या पत्रकाराने लाईव्ह रिपोर्टिंग करताना काम सोडत भूकंपात अडकलेल्या एका मुलीच्या मदतीसाठी धावला आहे. तुर्कीत सोमवारी ७.८ तीव्रतेचा भूकंप आला असून या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचं स्थानिक न्यूज चॅनेल A News चा प्रतिनिधी लाईव्ह रिपोर्टिंग करत होता. तेव्हा भूकंपामुळे एक इमारत कोसळली. ही घटना तुर्कीच्या मालाटया परिसरातील आहे. इमारत ढासळताना पाहून रिपोर्टर आणि आजूबाजूचे लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले.
या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात लोक जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळत असल्याचं दिसते. त्यावेळी रिपोर्टर आणि त्याचा कॅमेरामॅन रिपोर्टिंग सुरूच ठेवतात. परंतु पत्रकाराची नजर एक महिला आणि २ लहान मुलींवर पडते. जे भीतीच्या सावटाखाली होते. ते ढासळत असलेल्या इमारतीच्या काहीच अंतरावर होते. अशावेळी पत्रकाराने लाईव्ह रिपोर्टिंग सोडत त्या मुलीला वाचवण्यासाठी धावतो. तो पळत जात त्या मुलीला उचलून घेतो आणि तिला सुरक्षित स्थळी ठेवतो.
एका हातात माईक आणि दुसऱ्या हातात मुलीला उचलून तो रिपोर्टर घाबरलेल्या मुलीला सावरण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांची मने जिंकत आहे. तुर्कीत सोमवारी एका पाठोपाठ एक असे ३ भूकंप आले. सोमवारी संध्याकाळी तुर्कीत तिसरा भूकंपाचा झटका आला. ज्याची तीव्रता ६.० रिक्टर स्केल होती. तुर्की आणि सीरिया इथं आतापर्यंत भूकंपामुळे २ हजार ३१० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात संध्याकाळी ४ वाजता आलेल्या भूकंपाची तीव्रता ७.५ रिक्टर स्केल इतकी होती. तर आतापर्यंत भूकंपात १० हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.