Turkey President slams Israel PM Benjamin Netanyahu as Hamas War, इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या जोरदार युद्ध सुरु आहे. या युद्धात मोठ्या प्रमाणावर लोक मृत्यू पावले आहेत. अनेक निरपराध लोकांचा जीव गेला आहे. हमासच्या नेत्याने इस्रायलशी पाच वर्षांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला असून त्यासाठी एका स्वतंत्र देशाची अट ठेवली आहे. याच दरम्यान गाझा युद्धावरून तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन (Recep Tayyip Erdogan) यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर बोचरी टीका केली आहे. एर्दोगन यांनी नेतान्याहू यांचा उल्लेख 'गाझाचा कसाई' म्हणून केला आहे. इस्तानबूलमध्ये लीग ऑफ अल-कुड्स (जेरुसलेम) च्या खासदारांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केले.
"इस्रायलकडून सातत्याने लष्करी आक्रमण आणि सामान्य लोकांवर अन्याय केला जात आहे. सामान्यांवर सुरु असलेला अत्याचार ही खूप गंभीर बाब आहे. माझे एक म्हणणे तुम्ही लक्षात ठेवा, बेंजामिन नेतन्याहू यांचे नाव इतिहासात 'गाझाचा कसाई' म्हणून लिहिले जाईल. गाझामध्ये जे काही चालले आहे ते मानवतेच्या विरोधात आहे, तो नरसंहार आहे. आम्ही या नरसंहाराचा निषेध करू आणि नरसंहाराचा सामना करताना आम्ही गप्प राहण्याची अपेक्षा कोणीही करू नये", असा इशाराच एर्दोगन यांनी दिला. नुकतीच त्यांनी इस्तंबूलमध्ये हमास प्रमुख इस्माईल हनिया (Ismail Haniyeh) यांचीही भेट घेतली. "पूर्व जेरुसलेमची राजधानी असलेले स्वतंत्र आणि सार्वभौम पॅलेस्टाइन राज्य स्थापन करण्यासाठी तुर्कस्थान आपले प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. आम्ही इस्रायलवर सतत टीका करतच राहू," असेही एर्दोगन यांनी स्पष्ट केले.
हमास ५ वर्षांच्या युद्धविरामाला तयार, पण...
इस्रायल आणि हमास दोघांनाही काही बडे देश छुपा किंवा उघड पाठिंबा देत असल्याने युद्धाची तीव्रता वाढतच चालली आहे. असे असतानाच हमासकडून इस्रायलला पुढील पाच वर्षांसाठी युद्धविरामाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हमास संघटना पुढील ५ वर्षात इस्रायलविरूद्ध हत्यारही उचलणार नाही असा शब्द देण्यासही हमास तयार आहे. पण हे करण्यासाठी हमासने इस्रायलसमोर एक अट ठेवली आहे. हमासच्या म्हणण्यानुसार, ते ५ वर्षांच्या युद्धविरामाला तयार आहेत. पण त्यासाठी एका स्वतंत्र पॅलेस्टाइन देशाचे गठन करण्यात यावे आणि त्या देशाची सीमा १९६७ च्या आधीप्रमाणे असावी. हमास संघटनेचा नेता असलेल्या खलील अल हाया याने हा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले जात आहे.