Turkey-Syria: रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान जगावर आणखी एका युद्धाचे सावट, तुर्कीने सीरियाला दिला हल्ल्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:21 AM2022-06-06T11:21:06+5:302022-06-06T11:21:14+5:30
Turkey-Syria: अमेरिकेसह अनेक देशांनी तुर्कस्तानला याबाबत इशारा दिला आहे, मात्र राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.
Turkey-Syria: रशिया-युक्रेन युद्धाला 100 हून अधिक दिवस झाले असून युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे युद्ध थांबवण्याकडे अमेरिकेसह सर्व देशांचे लक्ष लागले आहे. पण, यातच या युद्धाचा फायदा घेण्याचा प्रयत्न तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या ग्रीसवर गरळ ओकली आणि सीरियामध्ये लष्करी कारवाई सुरू करण्याची धमकी दिली. अमेरिकेसह अनेक देशांनी तुर्कस्तानला याबाबत इशारा दिला आहे, मात्र एर्दोगन यांच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. एर्दोगनला तुर्कीची खराब अर्थव्यवस्था, गगनाला भिडणारी महागाई आणि सरकारची घसरलेली लोकप्रियता यावरुन लोकांचे लक्ष वळवण्याची एक चांगली संधी आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी गेल्या आठवड्यात ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्याशी सर्व संपर्क तोडण्याची घोषणा केली होती. मित्सोटाकिस यांनी अमेरिकन काँग्रेसला केलेले भाषण आणि F-35 लढाऊ विमानांच्या करारामुळे एर्दोगन संतापले आहेत. मित्सोटाकिस यांच्या अमेरिका दौऱ्यापासून तुर्कीच्या लष्करी विमानांची ग्रीसच्या हवाई हद्दीत घुसखोरी लक्षणीयरीत्या वाढली आहे. 13 मार्च रोजी इस्तांबूल येथे झालेल्या बैठकीदरम्यान, एर्दोगान आणि मित्सोटाकिस यांनी प्रक्षोभक वक्तृत्वापासून परावृत्त करणे, दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे, पूर्व भूमध्य समुद्रात स्थिरतेवर काम करणे आणि संपर्क वाढवणे यावर सहमती दर्शविली, परंतु हे सर्व बंद करण्यात आले आहे.
तुर्कीने अलीकडेच ग्रीसला पूर्व एजियन बेटांवरून सैन्य मागे घेण्याची धमकी दिली. तसे करण्यात अयशस्वी झाल्याने त्यांच्या सार्वभौमत्वाला आव्हान असल्याचे घोषित केले. तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी 14 बेटांचा नकाशाही सादर केला होता. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत, ग्रीक पंतप्रधान म्हणाले की बेटांसाठी तुर्कीच्या निरर्थक मागण्या ते मान्य करू शकत नाहीत. तुर्कीने आपले आक्रमक वर्तन आणि वक्तृत्व थांबवले पाहिजे. गरज पडल्यास अमेरिका आणि युरोपीय संघ आपले संरक्षण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ग्रीसवर दहशतवादी गटांना आश्रय आणि प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, तुर्कीमध्ये हल्ले करण्यासाठी ग्रीस दहशतवाद्यांना पैसा आणि संरक्षण देत आहे. ग्रीसही तुर्कस्तानवर असेच आरोप करत आहे.
एएनआयच्या म्हणण्यानुसार, युक्रेन युद्धात रशिया अडकत असताना, तुर्कीचे अध्यक्ष सीरियाच्या सीमेवर 30 किमी लांबीचे सुरक्षा क्षेत्र तयार करण्याची त्यांची जुनी योजना अंमलात आणण्याची एक चांगली संधी म्हणून पाहतात. सीरियातील निर्वासित ही तुर्कीसाठी मोठी समस्या आहे. त्या लोकांना ठेवण्यासाठी त्याला हा सुरक्षा क्षेत्र बनवायचा आहे. कुर्दिश दहशतवाद्यांना तुर्कीच्या सीमेपासून दूर ठेवण्याचा करार अयशस्वी ठरला आहे, त्यामुळे ते सीरियामध्ये त्यांच्यावर लष्करी कारवाई करणार असल्याचे तुर्की राष्ट्रपतींचे म्हणणे आहे. त्यांचे लक्ष्य मंजीब आणि ताल रिफत ही सीरियन शहरे आहेत, जिथे कुर्दिश सैन्याचे नियंत्रण आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी गेल्या बुधवारी तुर्कीला सीरियामध्ये संभाव्य लष्करी हल्ल्याबाबत इशारा दिला. अशा कोणत्याही हालचालीमुळे संपूर्ण परिसर धोक्यात येईल, असे ते म्हणाले होते. रशियानेही यावर प्रतिक्रिया दिली.