Turkey-Syria Earthquake Video: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप आणि त्यानंतरच्या धक्क्यांमुळे दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 20 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे दोन्ही देशांत हजारो इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले आहेत. बचाव पथक ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. यातच एक मनाला आनंद देणारी बातमी समोर आली आहे.
मदत आणि बचाव पथकाला इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक नवजात अर्भक सापडले. या चिमुकल्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नवजात बाळाला ढिगाऱ्यातून बाहेर काढून आणताना दिसत आहे. हा व्हिडिओ सीरियन आणि कुर्दिश विषयावरील पत्रकार होशांग हसन यांनी शेअर केला आहे. हसनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आजच्या भूकंपानंतर एका महिलेला ढिगाऱ्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा महिलेने मुलाला जन्म दिला.'
हसनने शेअर केलेल्या या व्हिडिओला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ही बातमी लिहेपर्यंत 5 सेकंदाचा हा व्हिडिओ 37 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, ट्विटला हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर 400 हून अधिक वेळा रिट्विट केले आहे. सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार, सीरियातील आफरीनमध्ये हे नवजात अर्भक सापडले. दरम्यान, मुलाला जन्म दिल्यानंतर त्याच्या आईचा ढिगाऱ्याखालीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.