तुर्की-सीरियातीलभूकंपात आतापर्यंत सुमारे 4300 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दल सातत्याने बचावकार्य करत आहेत. विनाशकारी भूकंपामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. हजारो लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. लोक त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. जे वाचले आहेत ते पूर्णपणे हतबल आहेत. घटनास्थळावरून अनेक हृदयद्रावक दृश्ये समोर येत आहेत. एक चिमुकली वाचल्यानंतर आपल्या आईचा शोध घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, जेव्हा मुलीला ढिगाऱ्यातून बाहेर काढले जाते तेव्हा ती तिच्या आईबाबत प्रश्न विचारू लागते. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, विनाशकारी भूकंपानंतर ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढल्यानंतर एक मुलगी सुरक्षा कर्मचार्यांना विचारते, "माझी आई कुठे आहे." हे ऐकून तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हेट शहरातील आहे. आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हजारो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने सुरक्षा कर्मचाऱ्यांना तिच्या आईबद्दल विचारणा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुर्कस्तान-सीरियात झालेल्या भीषण भूकंपात असंख्य इमारती कोसळल्या. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. लोकांची सातत्याने सुटका केली जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
"वाईट काळातच होते खऱ्या मित्राची ओळख"; मदतीसाठी तुर्कीने मानले भारताचे मनापासून आभार
भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये प्रचंड हाहाकार पाहायला मिळत आहे. आतापर्यंत चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 15 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. 5.6 हजार घरे आणि इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. या कठीण काळात भारताने तुर्कीला मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार भारत तुर्कीला तातडीने मदत पाठवत आहे. भारताने NDRF बचाव पथक, औषधे आणि वैद्यकीय पथक तातडीने तुर्कीला पाठवण्याची घोषणा केली. वाईट काळात भारताच्या या मदतीबद्दल तुर्कीने मनापासून भारताचे आभार मानले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"