इस्तंबूल : सीरियाच्या सीमेजवळ तुर्कस्तानकडून रशियाचे एक लढाऊ विमान पाडण्यात आल्यानंतर उभय देशांतील संघर्ष वाढलेला असताना बुधवारी तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तईप एर्दोगन यांनी आपल्यावतीने हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर नाटोच्या सहयोगी देशांना व्यापक संघर्ष होण्याची भीती वाटत आहे. रशियाचे विमान पाडण्यात आल्यानंतर यातील दोन पायलटपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देतांना कालच हा तर पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार असल्याचे म्हटले होते. रशियाच्या नागरिकांनी तुर्कस्तानात पर्यटनासाठी जाऊ नये असे आवाहनच त्यांनी केले आहे. तुर्कस्तानने म्हटले आहे की, रशियाच्या विमानाने पाच मिनिटात त्यांच्या हवाई सीमेचे दहा वेळा उल्लंघन केले. तर या विमानाने हवाई सीमेचे उल्लंघन केलेच नाही, असा दावा रशियाने केला आहे. तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तईप एर्दोगन यांनी इस्तंबूलमध्ये एका टीव्ही शोमध्ये संबोधित करताना सांगितले की, हे प्रकरण वाढविण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही आमची सुरक्षा आणि अधिकारांचे रक्षण करत आहोत. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे की, तुर्कस्तानला आपल्या सीमेचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण, हे प्रकरण तणावाचे होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी.(वृत्तसंस्था)
तणाव कमी करण्याचा तुर्कीचा प्रयत्न
By admin | Published: November 26, 2015 12:08 AM