मध्यपूर्वेतील परिस्थिती सातत्याने चिघळताना दिसत आहे. बहुतांश मुस्लीम देश इस्रायलला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणच्या समर्थनाने हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ले करत असतानाच, आता तुर्कस्ताननेही इस्रायलला हल्ल्याची धमकी दिली आहे. खरे तर, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव वाढला आहे. यामुळे तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांनी रविवारी इस्रायलवर लष्करी कारवाईची धमकी दिली. यानंतर आता, इस्रालयलनेही एर्दोगन यांच्या धमकिला इशारावजा प्रत्युत्तर दिले आहे. एर्दोगन यांचे हाल इराकचे माजी राष्ट्रपति सद्दाम हुसेन यांच्यासारखे होतील. ज्याला फाशी देण्यात आली होती, असे इजरायलने म्हटले आहे.
इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी 'X'वर एक पोस्ट करत म्हटले आहे, "इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी देऊन एर्दोगन सद्दाम हुसेन यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. तेथे काय झाले होते आणि ते कसे संपले, हे त्यानी स्मरणात ठेवायला हवे." एवढेच नाही तर, त्यांनी आपल्या पोस्टसोबत सद्दाम हुसेन आणि एर्दोगन यांचा फोटोही शेअर केला आहे. महत्वाचे म्हणजे, तुर्की इस्रायलमध्ये घुसू शकते, ज्या पद्धतीने ते लिबिया आणि नागोर्नो-काराबाखमध्ये घुसले होते, अशी धमकी एर्दोगन यांनी दिल्यानंतर, काट्झ यांची प्रतिक्रिया आली आहे.
इस्रायलला धमकी -एर्दोगन हे इस्रायलच्या गाझातील सैन्य कारवाईचे कट्टर विरोधक राहिले आहेत. आपल्या संरक्षण उद्योगासंदर्भात बोलताना ते अचानक युद्धाच्या चर्चेकडे वळले. आपल्या पक्षाच्या बैठकीत एर्दोगन म्हणाले, "आपण अत्यंत मजबूत व्हायला हवे. जेणेकरून इस्रायल पॅलेस्टाइनसोबत हास्यास्पद गोष्टी करणार नाही. आपण ज्यापद्धतीने काराबाखमध्ये प्रवेश केला होता, ज्या पद्धतीने लिबियावर चढाई केली होती, तसे करू शकतो. आपण असे करू शकणार नाही, असे कुठलेही कारण नाही. अशी पावलं उचण्यासाठी आपल्याला मजबूत राहावे लागेल." यासंदर्भात इस्रायलने अद्याप अधिकृतपणे कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.