Turkiye Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 11 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, तुर्कस्तानच्या दुर्गम भागात 10 भारतीयही अडकले असून एकजण बेपत्ता असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
बुधवारी (8 फेब्रुवारी) परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) संजय वर्मा यांनी सांगितले की, भूकंपात मदत करण्यासाठी तुर्कीच्या अडाना येथे नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. बेपत्ता भारतीय एका व्यावसायिक बैठकीसाठी गेला होता. आम्ही त्याच्या कुटुंबाच्या आणि कंपनीच्या संपर्कात आहोत.
'सर्वात मोठी आपत्ती'संजय वर्मा यांनी सांगितले की, तुर्कीमध्ये 1939 नंतरची ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. आम्हाला तुर्कीकडून मदतीसाठी ईमेल आला आणि आम्ही दिल्लीहून तुर्कीला जाणारी पहिली SAR फ्लाइट रवाना केली. यानंतर अशी 4 उड्डाणे पाठवण्यात आली, त्यापैकी 2 एनडीआरएफ टीम आणि 2 वैद्यकीय पथके होती. वैद्यकीय साहित्य आणि उपकरणे घेऊन जाणारे विमानही सीरियाला पाठवण्यात आले आहे.
तुर्कीत मोठा विध्वंससीरिया आणि तुर्कीमध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) 7.8 रिश्टर स्केल आणि त्यानंतर 7.5 रिश्टर स्केलचे धक्के बसले होते. सध्या बचावकार्य सुरू आहे, मात्र बर्फवृष्टीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतातील तुर्की राजदूताने मंगळवारी (7 फेब्रुवारी) सांगितले होते की दक्षिण-पूर्व तुर्कीमध्ये 14 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. या घटनेत 21,103 लोक जखमी झाले आहेत आणि सुमारे 6000 इमारती कोसळल्या आहेत.