कोक्स बाझार : रोहिंग्या मुस्लीम निर्वासितांना घेऊन निघालेली बोट उलटून किमान १२ जण मरण पावले असून, अनेक जण बेपत्ता आहेत. मृतांत १० लहान मुले, एक महिला व एक पुरुष आहे. किनारा आणि सीमारक्षक अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार बोटीत क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे सुमारे १०० जण होते. म्यानमार आणि बांगलादेशला यांच्यामधील नाफ नदीच्या मुखापाशी रविवारी रात्री उशिरा बोट बुडाली. सर्व मृतदेह हाती लागले. म्यानमारमधील रखाइन राज्यातील खेड्यांतून पळालेले ४० प्रौढ रोहिंग्या मुस्लीम बोटीत होते. सोबत असंख्य मुले होती.बॉर्डर गार्ड बोटींनी तीन महिला व दोन मुलांसह १३ रोहिंग्यांना वाचवले. बोट म्यानमारच्या भागात बुडाल्यामुळे अनेक जण पोहून रखाइनच्या किनाºयावर आले असावेत. वाईट हवामान आणि उंच लाटांमुळे रात्री दहाच्या सुमारास बोट बुडाल्याचे किनारा रक्षकाने सांगितले.गेल्या आॅगस्टपासून जवळपास पाच लाख २० हजार रोहिंग्या मुस्लीम रखाइन राज्यातून बांगलादेशकडे आले आहेत. त्यातील अनेकांनी जंगलातून पायी तर काहींनी धोकादायक बोटींतून प्रवास केला आहे.
बोट उलटून बारा निर्वासित बुडाले ,अनेक रोहिंगे झाले बेपत्ता; बोटीतील प्रवास अतिधोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 1:05 AM