चीनमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. चीनच्या संदू काउंटीमध्ये एक्स्प्रेस वेवर बस उलटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत बसमधील 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, बसमध्ये एकूण 47 लोक होते, त्यापैकी 27 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडझओऊ प्रांताची राजधानी असलेल्या गुडयांग शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या संदू काउंटमध्ये बस उलटल्याने 27 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
काही दिवसांपूर्वी चीनच्या चांगशा शहरात एका सरकारी कंपनीच्या बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. बहुमजली इमारतीतील अनेक मजल्यांमध्ये ही भीषण आग लागल्याने मोठं नुकसान झालं होतं. या इमारतीमध्ये अनेकांची घरे आणि कार्यालये होती. चीनमधील सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमची ही इमारत होती.
शहराच्या मध्यभागी इमारत असल्यामुळे संपूर्ण शहरातून ही आग दिसत होती. स्थानिक माध्यमांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये धुरामुळे इमारत बाहेरून पूर्णपणे काळी पडल्याचे पाहायला मिळालं. चांगशा ही हुनान प्रांताची राजधानी आहे, जिथे सुमारे 10 मिलीयन लोक राहतात.