ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - ट्विटरवर एखादं ट्विट केलं आणि त्यात काही चुकलं असेल तर ट्विट डिलीट करणे हा एकमेव पर्याय होता. एडीटची सुविधा नसल्याने अनेकदा ट्विट डिलीटच करावं लागत असे. पण लवकरच ही समस्या सुटणार असून ट्विटकरांना ट्विट एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. ट्विटरचे सीईओ जॅक दोरसे यांनी एडिटचा पर्याय देण्याची गरज असल्याचं मान्य केलं आहे. हे फिचर असावं असं त्यांनी मान्य केलं असलं तरी कधीपर्यंत ही सुविधा उपलब्ध होणार आहे याचा खुलासा त्यांनी केलेला नाही.
जॅक दोरसे यांनी 2017 मध्ये कोणत्या नवीन गोष्टी ट्विटरमध्ये असाव्यात किंवा बदल करावेत यावर प्रतिक्रिया मागवल्या होत्या. या प्रश्नाच्या उत्तरात अनेकांनी जँक यांनी एडिटचा पर्याय असावा अशी विनंती केली. यामधील एका विनंतीला उत्तर देत जॅक दोरसे यांनी ट्विट एडिट करण्याला काही कालमर्यादा अपेक्षित आहे की वेळेची मर्यादा नसावी असा प्रश्नही विचारला.
आपल्या चुकांना सुधरवण्यासाठी अगोदरपासून हे फिचर देण्याची मागणी केली जात आहे. मात्र यामध्ये आपण काय एडिट केलं हेदेखील दिसलं पाहिजे असं मत जॅक दोरसे यांनी व्यक्त केलं. एका युजरने फक्त नोंदणीकृत युजर्सना हे फिचर उपलब्ध असावं असं सुचवलं. यावर जॅक दोरसे यांनी जर हे फिचर आलं तर ते सर्वांसाठीच असेल अशी माहिती दिली.
This is our most requested feature (today & always). Mostly to quickly fix mistakes. Anything beyond would need to show revision history https://t.co/fHtGNjkuEx— jack (@jack) December 29, 2016
जॅक दोरसे हे फीचर आणण्याच्या बाजूने दिसत असले तरी यावर्षी हा पर्याय मिळेल याची शाश्वती नाही. हे फीचर आणण्यासंबंधी चर्चा सुरु असून निर्णय होण्यास वेळ लागू शकतो.
दुसरीकडे ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करायची असेल तर त्याला मोजक्या शब्दांची मर्यादा आहे. तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते 140 शब्दांमध्येच बसवाव लागतं. यामुळे काही जणांना आपलं म्हणण नीट मांडता येत नाही, त्यामुळे ही शब्दमर्यादा वाढवावी अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.