ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २३ - टि्वटरचे सहसंस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी यांनी आपल्या मालकीच्या कंपनीमधल्या एकूण शेअर्सपैकी एक तृतीयांश म्हणजे जवळपास १९७ दशलक्ष डॉलर्स किमतीचे शेअर्स कर्मचा-यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे माझ्या कर्मचा-यांमध्येच गुंतवणूक होत असल्याची प्रतिक्रिया डोर्सी यांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यात अनेक दिग्गजांनी टि्वटर सोडली होती. तर गेल्या आठवड्यामध्ये डोर्सी यांनी ३३६ एवढी कर्मचारी कपात जी जवळपास ८ टक्के आहे, करण्याची घोषणा केली होती.
या पार्श्वभूमीवर कर्मचा-यांची मानसिकता सकारात्मक व्हावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे एक तृतीयांश किंवा १९७ दशलक्ष डॉलर्स किमतीचे शेअर्स एम्प्लॉयी इक्विटी पूलमध्ये जाणार असून, त्याचा थेट लाभ कर्मचा-यांना जास्त उत्पन्न मिळण्यात होणार आहे.
डोर्सी यांनी यासंदर्भात कुठल्यातरी छोट्या गोष्टीचा मोठा हिस्सा राखण्यापेक्षा भव्य गोष्टीचा लहान हिस्सा राहाण्यात मला रस असल्याचे मार्मिक टि्वट केले आहे.
विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव बामर यांनी ट्विटरचे ४ टक्के समभाग खरेदी केले आहेत, आणि आता त्यांचा हिस्सा ३.२ टक्के हिस्सा असलेल्या टि्वटरच्या डोर्सी या सहसंस्थापकांपेक्षा जास्त आहे.