वॉशिंग्टन : नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट १२ तासांसाठी, तर फेसबुकने २४ तासांसाठी लॉक केले आहे. तसेच, नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा सुद्धा ट्विटरने दिला.
"वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे तिन ट्वीट्स हटवावेत, अशी आमची मागणी आहे. नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि गंभीर उल्लंघन त्यांनी केले आहे," असे ट्विटरने म्हटले आहे. ट्विट्स न हटवल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट लॉक राहील, असेही ट्विटरने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, २०२० मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अद्याप राजकीय पेच सुरूच आहेत. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांच्याकडून निवडणुकीत गोंधळ उडाल्याचा आरोप करत दबाव आणला जात होता. यातच आता डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी (Donald Trump supporters) व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळ घातला. त्यामुळे वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
फेसबुकने हटविला ट्रम्प यांचा व्हिडीओट्विटरनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ फेसबुकने डिलीट केला. दरम्यान, अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. "आम्ही ट्रम्प यांचा व्हिडिओ हटविला आहे, कारण ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरु असलेल्या हिंसाचार कमी करण्याऐवजी प्रोत्साहन देत होता," असे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी गाय रोसेन यांनी म्हटले आहे.
...हा देशद्रोह आहे - जो बायडेननवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. "मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावे आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावे", असे जो बायडेन म्हणाले. याचबरोबर, कॅपिटल बिल्डिंगमध्ये जो गोंधळ आपण पाहिला आहे, ते आम्ही नाही आहोत. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे, असे जो बायडेन यांनी सांगितले.