वॉशिंग्टन : जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका कोरोनापुढे मात्र हतबल झाल्याची पाहायला मिळत आहे. यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. यातच आता सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरनेही डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे.
ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांना काही ट्विट्सला फ्लॅग करत फॅक्ट-चेकचा इशारा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलण्याच्या स्वातंत्र्याविरूद्ध असल्याचे सांगितले. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप असल्याचे म्हटले आहे.
मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दोन ट्विट्सवरून ट्विटरने त्यांना इशारा दिला. मेल-इन बॅलेट्सला बनावट आणि 'मेल बॉक्स लुटला जाईल' असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत अकाऊंटवर केले होते. या ट्विटवर एक लिंक येत आहे, त्यावर लिहिलेले, मेल-इन बॅलेट्सविषयी तथ्य जाणून घ्या. ही लिंक ट्विटर युजर्संना मोमेंट्स पेजवरील फॅक्ट चेककडे घेऊन जाते. याठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अप्रमाणित दाव्यांबाबतच्या बातम्या दिसतात.
दरम्यान, ट्विटरच्या या कारवाईला डोनाल्ड ट्रम्प यांनी लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "ट्विटर आता 2020च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतही हस्तक्षेप करीत आहे. मेल-इन बॅलेटसंदर्भात माझे विधान भ्रष्टाचार आणि फसवणूक करेल. हे चुकीचे आहे. ही बनावट बातमी सीएनएन आणि अॅमेझॉन वॉशिंग्टन पोस्टच्या तथ्य तपासणीवर आधारित आहे."
याचबरोबर, दुसर्या ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "ट्विटर बोलण्याच्या स्वातंत्र्यावर पूर्णपणे हल्ला करत आहे. मी राष्ट्रपती म्हणून हे होऊ देणार नाही." दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळताना दिसून आले होते. यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना लक्ष्य करत ट्विट केले होते.