न्यूयॉर्क - कोलंबियाजवळ कॅरेबियन समुद्रात दोन प्राचीन जहाजांचं अवशेष सापडले आहेत. कोलंबियाचे राष्ट्रपती इव्हान ड्युक यांनी सोमवारी सांगितले की, कोलंबियन नौसैनिकांनी या जहाजांचा शोध घेतला आहे. नौदलाचे अधिकारी दीर्घकाळापासून समुद्रात बुडालेल्या सॅन जोस गॅलियनवर देखरेख करत आहेत. या जागेच्या जवळच त्यांना अजून दोन ऐतिहासिक जहाजं सापडली.
सॅन जोस गॅलियनला इतिहासकार हे माहितीचा खजिना मानतात. सॅन जोस गॅलियन १७०८ मध्ये कोलंबियातील कॅरेबियन बंदर कार्टाजेना येथे बुडाले होते. २०१५ मध्ये सॅन जोस गॅलियनचा शोध घेण्यात आला होता. या जहाजाच्या अवशेषांच्या मालकी हक्कावरून दीर्घकाळ वाद सुरू आहे.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, समुद्रामध्ये रिमोटवर चालणाऱ्या वाहनाच्या मदतीने ९०० मीटर खोलपर्यंत पोहोचले होते. तिथे हे जहाज सापडले. आरओव्हीने जवळच्या दोन अन्य जहाजांच्या अवशेषांचाही शोध घेतला. ही जहाजे सुमारे २०० वर्षांपूर्वी बुडाली होती. हा काळ स्वातंत्र्यासाठी कोलंबियाने स्पेनविरोधात पुकारलेल्या युद्धाच्यादरम्यानचाच होता.
या ठिकाणचे जे फोटो समोर आले आहेत, ते सॅन जोसच्या खजिन्यातील आतापर्यंतचा सुंदर नजारा दाखवतात. यामध्ये सोन्याचे दागिने, नाणी दिसतात. तसेच १६५५ मध्ये सेविलेमध्ये तयार केलेल्या तोफाही मिळाल्या आहेत, तसेच चिनी वस्तूही मिळाल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, नौदल आणि सरकारचे पुरातत्त्ववेत्ते, शिलालेखांच्या आधारावर खजिन्याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.