मॉस्को : रशियात कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना रविवारी मॉस्को न्यायालयात हजर करण्यात आले. यापैकी दोघा संशयितांनी या प्राणघातक हल्ल्यात सहभागाची कबुली दिली आहे. कॉन्सर्टमध्ये झालेल्या या हल्ल्यात १३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. अटक केलेल्यांपैकी तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे आधी सांगण्यात आले होते.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघा संशयितांनी प्राणघातक हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे. तपास यंत्रणांनी डेलरडजॉन मिर्जोयेव (३२), सईदाक्रामी रचाबलीजोडा (३०), शम्सीदीन फरीदुनी (२५) आणि मुखमदसोबीर फैजोव (१९) या चौघांना दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याच्या आरोपावरून अटक केली होती. हे सर्व संशयित ताजिकिस्तानचे नागरिक आहेत.
मॉस्कोच्या बासमन्नी जिल्हा न्यायालयाने या संशयितांना २२ मेपर्यंत चौकशीसाठी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिर्जोयेव आणि रचाबलिजोडा यांना हल्ल्यासाठी दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणी अटक झालेला चौथा संशयित फैजोव याला हॉस्पिटलमधून व्हीलचेअरवरून न्यायालयात आणले होते. न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान, तो डोळे बंद करून बसून होता. सुनावणीदरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याची देखभाल केली. (वृत्तसंस्था)
दहशतवादी हल्ल्यादरम्यान, सुरक्षा यंत्रणेला तपासावेळी एका शौचालयात २८ जणांचे मृतदेह आढळून आले होते. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर पेट्रोल ओतून कॉन्सर्ट हॉलला आग लावली होती. काहीजणांचा मृत्यू गोळी लागून झाला असला तरी बहुसंख्य जणांचा मृत्यू आगीमुळे झाल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे.
कॉन्सर्टच्या ठिकाणी, उपनगरातील क्रोकस सिटी हॉलमध्ये शुक्रवारी झालेल्या या हल्ल्याबद्दल रशियात राष्ट्रीय शोक दिन पाळण्यात आला. इस्लामिक स्टेट गटाशी संलग्न असलेल्या गटाने हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत रशियात झालेला हा सर्वांत प्राणघातक हल्ला मानला जात आहे.
रविवारी सांस्कृतिक संस्थांमधील कार्यक्रम रद्द करण्यात आले. दरम्यान, मॉस्कोच्या आरोग्य विभागाने रविवारी सांगितले की डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटविण्यास सुरुवात केली आहे आणि या प्रक्रियेस किमान दोन आठवडे लागतील. पुतिन यांनी या हल्ल्याला ‘एक रक्तरंजित, रानटी दहशतवादी कृत्य’ असे म्हटले आहे.