वॉशिंग्टन - अमेरिकेलीत फ्लोरिडा येथे दोन शिकाऊ विमानांची आकाशातच टक्कर झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 19 वर्षीय भारतीय तरुणीचा समावेश आहे. मंगळवार 17 जुलै रोजी ही दुर्घटना घडल्याचे उड्डयन प्राधिकरणाने म्हटले आहे. निशा सेजवाल असे भारतीय युवतीचे नाव आहे.
फ्लोरिडातील या दोन्ही विमानांचे उड्डाण शिकाऊ पायलटांकडून करण्यात आले होते. या अपघातात या दोन पायलटांसह एकूण तीन जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आणखी एकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात 19 वर्षीय भारतीय मुलीचा मृत्यू झाला असून तिने 2017 मध्येच येथील शिक्षणसंस्थेत प्रवेश घेतला होता. हे दोन्ही विमान पायपर पीए-34 आणि सेसना 172 डीन इंटरनॅशनल फ्लाइट स्कूलमधील असल्याची माहिती मियामी डेड काऊंटीच्या महापौरांनी दिली. दरम्यान, या विमान प्रशिक्षण स्कूलमधील 12 पेक्षा जास्त विमानांचा दुर्दैवी अपघात झाला आहे. सन 2007 ते 2017 या कालावधीत हे अपघात झाले आहेत.