मोगादिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीसमोर शनिवारी झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटांमध्ये १००हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर ३००पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. ही माहिती त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी दिली आहे. अल् शबाब या दहशतवादी संघटनेने दोन कारबॉम्ब स्फोटांची जबाबदारी स्वीकारल्याचे सोमालिया सरकारच्या सूत्रांनी सांगितले.
मोगादिशू पोलिसांचे प्रवक्ते सादिक दूदिशे यांनी सांगितले की, मृतांमध्ये लहान मुले, महिला यांचाही समावेश आहे. शिक्षण मंत्रालयाची इमारत, तेथे असलेली एक शाळा, निरपराध नागरिक यांना लक्ष्य करण्यासाठीच हे कार बॉम्बस्फोट घडविण्यात आले. त्यात सोमालियातील वृत्तवाहिनीचा एक पत्रकार मोहम्मद इसे कोना यांचाही मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. स्फोटांमुळे अनेक जणांच्या जागीच चिंधड्या उडाल्या. पहिला बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक लोक घटनास्थळी धावले व काही मिनिटांतच दुसरा बॉम्बस्फोट झाला.
अल् शबाबच्या वाढत्या कारवाया-
सोमालियामध्ये अल् कायदाशी संलग्न असलेली अल् शबाब ही संघटना गेल्या दहा वर्षांपासून त्या देशात घातपाती कारवाया करत आहे. विद्यमान केंद्र सरकारला घालवून अल् शबाबला सत्तेवर कब्जा करायचा आहे. यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मोगादिशू येथील हयात हॉटेलवर अल् शबाबच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात २० जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी दहशतवादी व सुरक्षा सैनिकांमध्ये सुमारे ३० तास चकमक झाली होती.