ऑनलाइन लोकमत
ब्रसेल्स, दि. २३ - बेल्जियम प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ब्रसेल्स विमानतळावर हल्ला करणा-या आत्मघातकी हल्लेखोरांची ओळख पटली आहे. खालिद आणि ब्राहीम अल बाकरावायी अशी या दोघांची नावे असून, दोघेही सख्खे भाऊ आहेत. या दोघांसोबत फोटोमध्ये असणा-या तिस-या हल्लेखोराची ओळख मात्र अद्यापही पटलेली नाही असे आरटीबीएफ वृत्तवाहिनीने सांगितले.
मंगळवारी सकाळी ब्रसेल्स विमातळावर दोन आणि मेट्रो स्थानकात एक असे एकूण तीन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात ३४ जण ठार झाले तर, २५० नागरीक जखमी झाले. बेल्जियमने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
फोटोमधील दोन हल्लेखोरांनी स्फोट घडवून आत्महत्या केली असून एका हल्लेखोराकडील बॉम्ब न फुटल्याने त्याचा कट फसला. फोटोमधील हॅट घातलेला हल्लेखोर जिवंत असल्याचा संशय आहे.