टोकियो : जपानमधील डायमंड प्रिन्सेस या क्रूझमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू असलेले दोन प्रवासी गुरुवारी मरण पावले. मृतांमध्ये एक वयोवृद्ध महिला व पुरुषाचा समावेश आहे. या क्रूझवरील कोरोनाग्रस्तांचा बळी जाण्याची ही पहिलीच घटना आहे.
क्वारंटाईनचा १४ दिवसांचा कालावधी संपल्याने तसेच कोरोनाची लागण न झालेल्या ४४३ प्रवाशांना बुधवारी या क्रूझवरून घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. या प्रवाशांना सर्वत्र फिरण्याची मुभा दिल्याने जपानमधील नागरिक धास्तावले आहेत. हा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितावह नसल्याची टीकाही होत आहे. डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील उरलेल्या प्रवाशांना येत्या तीन दिवसांत घरी पाठविले जाईल.चीनमध्ये गेल्या महिनाभरात कोरोनाचा संसर्ग झालेले नवे रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. देशभरात सध्या करोनाचे ७४,५०० रुग्ण आहेत. चीनमध्ये आणखी ११४ बळी गेल्याने करोनाने मरण पावलेल्यांची संख्या आता २,११८ झाली आहे.