सिंध: पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सकाळच्या सुमारास एक मोठा अपघात झाला आहे. सिंधच्या डहारकी भागात दोन रेल्वेगाड्यांनी एकमेकांना धडक दिली. यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिल्लत एक्स्प्रेस आणि सर सय्यद एक्स्प्रेसची जोरदार धडक झाली. दोन्ही एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. तर काही डबे उलटले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सिंधमधील घोटकी भागात रेल्वे गाड्यांचा अपघात झाला. जियो टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, मिल्लत एक्स्प्रेसचे डबे नियंत्रणाबाहेर जाऊन रेल्वे रुळांच्या शेजारी पडले. त्याचवेळी समोरून येत असलेल्या सय्यद एक्स्प्रेसनं मिल्लत एक्स्प्रेसला धडक दिली. यामुळे सय्यद एक्स्प्रेसचे चार डबे इंजिनासह रुळांवरून घसरले. या अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० ते ५० जण जखमी झाले आहेत. मिल्लत एक्स्प्रेसचे ८ डबे रुळांवरून खाली घसरले आहेत. मिल्लत एक्स्प्रेस कराचीहून सरगोधाला, तर सय्यद एक्स्प्रेस रावळपिंडीहून कराचीला जात असताना हा अपघात झाला. त्यावेळी पहाटेचे पावणे चार वाजले होते. अपघात झाल्यानंतर ४ तासांनंतरही रेल्वेचे अधिकारी दुर्घटनास्थळी पोहोचले नाहीत. अद्यापही अनेक प्रवासी अपघातग्रस्त डब्यांमध्ये अडकले आहेत. डबे कापून त्यांची सुटका करण्याचं काम अद्याप सुरू व्हायचं आहे. अनेक जखमींना ट्रॅक्टर ट्रॉलीमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेल्वेचे डबे कापण्यासाठी लागणारे कटर्स आणि इतर साहित्य अद्याप तरी घटनास्थळी आणण्यात आलेलं नाही.