बर्लिन - दुसरे महायुद्ध संपून जवळपास 75 वर्षे होत आली आहेत. मात्र या युद्धाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या अनेक खाणाखुणा अजूनही युरोपमध्ये दिसून येतात. दरम्यान, जर्मनीमधील डॉर्टमुंड शहरात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तयार करण्यात आलेला भलामोठा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. बॉम्ब सापडल्याचे वृत्त शहरात पसरताच लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरदार सोडून पळू लागले. जर्ममीच्या पश्चिम भागात असलेल्या डॉर्टमुंट येथे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील चार बॉम्ब सापडले आहेत. यापैकी प्रत्येक बॉम्बचे वजन सुमारे 250 किलो आहे. दरम्यान, बॉम्ब सापडल्याचे वृत्त समजताच सुरक्षा यंत्रणांनी हे बॉम्ब ताब्यात घेऊन ते निष्क्रिय केले. मात्र हे बॉम्ब सापडल्याची वार्ता डॉर्टमुंड शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. चार महाकाय बॉम्ब सापडल्याचे कळाल्याने लोक जीव वाचवण्यासाठी शहर सोडून पळू लागले. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. तसेच वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीही निर्माण झाली. एकीकडे बॉम्ब सापडल्याची भीती असतानाचा हे बॉम्ब पाहण्याच्या कुतुहलापोटी घटनास्थळावर बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. मात्र या गर्दीला हटवताना सुरक्षा दलांच्या नाकी नऊ येत असतात. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या महायुद्धाला 75 वर्षे उलटून गेल्यानंतरही जर्मनीमध्ये सातत्याने युद्धकाळात वापरले न गेलेले बॉम्ब आणि अन्य स्फोटक सामुग्री सापडत असते.
या शहरात सापडले अडीचशे किलोचे बॉम्ब, घाबरलेल्या लोकांनी घरदार सोडून काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 4:07 PM