लंडन : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळात विविध वंशांच्या मंत्र्यांना महत्त्वाची खाती दिली आहेत. भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन यांना गृहमंत्रिपद देण्यात आले आहे. भारतीय वंशीय आलोक शर्मा (५५ वर्षे) यांच्याकडील कॉप २६ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून असलेली जबाबदारी लिज ट्रस यांनी कायम ठेवली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील ट्रस यांचे प्रतिस्पर्धी सुनक यांच्या निकटवर्तीयांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आलेली नाही.
ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन (४२ वर्षे) यांची आई तामिळी आहे. त्यांच्या आईचे पूर्वज मॉरिशसमध्ये स्थायिक झाले होते, तर सुएला यांचे वडील गोव्याचे मूळ रहिवासी असून ते केनियातून ब्रिटनमध्ये आले व तिथे स्थायिक झाले होते. तर आलोक शर्मा यांचा जन्म आग्रा येथे झाला आहे. लिज ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी क्वासी क्वार्तेंग हे पहिले कृष्णवर्णीय चॅन्सलर बनले आहेत. त्यांचे पूर्वज घाना देशातील रहिवासी होते. जेम्स क्लेव्हरली यांना परराष्ट्र खात्याचा भार सोपविण्यात आला आहे.