हमासविरोधात पुकारलेल्या युद्धादरम्यान, इस्राइलने ३१ जुलै रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत इस्राइलने हमासचा नेता इस्माइल हानिया याची उत्तर तेहरानमधील अत्यंत सुरक्षित अशा भागात घरामध्ये बॉम्बस्फोट घडवून हत्या केली. सुरुवातीला इस्राइलने हवाई हल्ला करून हानिया याची हत्या केल्याचा दावा हमासकडून करण्यात आला. तर इराणी प्रसारमाध्यमांनी ड्रोनद्वारे ३ क्षेपणास्रे डागण्यात आली. नंतर ही क्षेपणास्त्रे इराणबाहेरून डागण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हानियाची हत्या करण्यासाठी इस्राइलची गुप्तहेर संघटना मोसादने आखलेला प्लॅन आता समोर आला आहे.
इस्माइल हानिया याच्या हत्येप्रकरणी सातत्याने नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. अनेक माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार मोसादने इराणमधील एजंटांना इस्माइल हानिया वास्तव्यास असणाऱ्या तेहरानमधीस इमारतीमध्ये स्फोटके ठेवण्यासाठी नियुक्त केलं होतं. इस्माइल हानियाच्या हत्येची योजना मे महिन्यामध्ये आखण्यात आली होती. हानिया इराणीचे तत्कालीन राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या अंत्यसंस्कारासाठी तेहरानच्या दौऱ्यावर आला असताना त्याची हत्या करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र तेव्हा मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने ही योजना रद्द करण्यात आली. कदाचित हा प्लॅन अयशस्वी ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे तो स्थगित करण्यात आला.
दरम्यान, नव्याने आखण्यात आलेल्या योजनेनुसार मोसादच्या सूचनेनुसार काम करत असलेल्या दोन हस्तकांनी उत्तर तेहरानमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स गेस्ट हाऊसच्या तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये स्फोटकं ठेवली. हानिया इथेच वास्तव्यास राहील, याचा अंदाज घेऊन हे ठिकाण निवडण्यात आलं. आता इराणी अधिकाऱ्यांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एजंट तिथे फिरताना आणि अनेक खोल्यांमध्ये घुसून बाहेर येताना दिसत आहेत. दरम्यान, स्फोटकं पेरल्यानंतर हे एजंट कुणाच्याही हाती न लागता इराणच्या बाहेर निघून गेले. मात्र त्यांनी आपला एक हस्तक इराणमध्ये ठेवला होता. दरम्यान, ३१ जुलै रोजी पहाटे २ च्या सुमारास स्फोट घटवण्यात आला. त्यात इस्माइल हानिया याचा मृत्यू झाला.